‘डीआरडीओ’कडून ‘पिनाका रॉकेट’ यंत्रणेच्या प्रगत आवृत्तीची चाचणी

नवी दिल्ली – ‘संरक्षण संशोधन विकास संस्थे’ने (डीआरडीओ) ‘पिनाका रॉकेट यंत्रणे’च्या प्रगत आवृत्तीची चाचणी घेतली. ‘डीआरडीओ’ने सहा क्षेपणास्त्रे डागली आणि सर्व क्षेपणास्त्रांनी लक्ष्याचा अचूक भेद घेत आपले सर्व निकष पूर्ण केल्याचे ‘डीआरडीओ’च्या अधिकांऱ्यानी म्हटले आहे. गेल्या दोन महिन्याभरातील ‘पिनाका’ची ही दुसरी चाचणी ठरते. चीन आणि पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर ‘पिनाका’ रॉकेटस् तैनात करण्यात आली आहेत.

प्रगत आवृत्ती

बुधवारी सकाळी ‘डीआरडीओ’ने ओडिशाच्या चांदीपूर तळावरुन ‘पिनाका रॉकेट यंत्रणे’ची यशस्वी चाचणी घेतली. ‘डीआरडीओ’ने विकसित केलेली ‘पिनाका’ची ही प्रगत आवृत्ती ‘पिनाका एम के-१’ ची जागा घेईल, असे ‘डीआरडीओ’ने म्हटले. ‘डीआरडीओ’च्या पुण्यातील लॅबॉटेरिजमध्ये या आवृत्तीची निर्मिती करण्यात आली. ‘पिनाका एम के- १’ ची मारक क्षमता ४० किलोमीटर पर्यंत होती. पण प्रगत आवृत्तीच्या पिनाकाची मारक क्षमता ६० किलोमीटर इतकी असल्याचे सांगितले जाते.

गेल्या दोन महिन्यात भारताने १३ क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्याचे आहेत. काही दिवसांपूर्वी भारत पिनाका’ची प्रचंड प्रमाणात निर्मिती करणार असल्याचे आणि यासाठीची प्रक्रिया सुरु झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. तसेच सप्टेंबरमध्ये ‘पिनाका रॉकेट लॉन्चर्स’च्या (सहा पिनाका रेजिमेंट्स) खरेदीसाठी भारतीय कंपन्याबरोबर २५८० कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता.

leave a reply