चीनविरोधात खड्या ठाकलेल्या तैवान, जपानचे भारताने नेतृत्त्व करावे

- चीनविरोधी लोकशाही समर्थक गटाची मागणी

टोरंटो/ नवी दिल्ली – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधातील लढ्यात भारताने जपान आणि तैवानसारख्या लोकशाहीवादी देशांची आघाडी उभी करुन त्याचे नेतृत्त्व करावे, अशी मागणी आवाहन ‘ग्लोबल कॅम्पेन फॉर डेमोक्रॅटीक चायना’ या गटाने केली. मानवाधिकारांचे समर्थक, विश्लेषक आणि चीनकडून पिळवणूक झालेल्या अल्पसंख्यांकांच्या गटाच्या प्रतिनिधींचा वेबिनार नुकताच पार पडला. यावेळी लोकशाहीवादी देश तसेच जगभरातील व्यापारी संघटनांनी देखील चीनच्या विरोधात एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले. जगभरात चीनविरोधात आक्रमक होत असलेली आघाडी आणि भारताचे वाढत असलेले महत्त्व चीनला अस्वस्थ करणारे ठरत आहे.

नेतृत्त्व

दोन दिवसांपूर्वी १ ऑक्टोबर रोजी चीनचा ‘नॅशनल डे’ होता. या निमित्ताने जगभरातील किमान २५ देशांमधील ५० शहरात चीनची आक्रमकता तसेच दडपशाहीविरोधात जोरदार निदर्शने झाली. उत्तर अमेरिकेपासून आशिया आणि युरोपिय देशांमध्ये या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी हाँगकाँगमध्ये एका निदर्शकाने भारताचा राष्ट्रध्वज घेऊन चीनच्या विरोधात केलेले निदर्शन माध्यमांचे लक्ष वेधून घेणारी घटना ठरली होती. चीनविरोधात आक्रमकपणे लढणार्‍या भारताला हे आमचे समर्थन असल्याचे या निदर्शकाने जाहीर केले होते. या घटनेमुळे हाँगकाँगवासिय तसेच आग्नेय आशियाई देशांसाठी भारत आशास्थान बनल्याचे यानिमित्ताने समोर आले होते.

चीनच्या याच दडपशाही आणि विस्तारवादी भूमिकेच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी ‘ग्लोबल कॅम्पेन फार डेमोक्रॅटीक चायना : युनायटिंग अगेन्स्ट चायनीज कम्युनिस्ट पार्टीज् रिप्रेसिव्ह रिजिम’ या गटाने वेबिनार घेऊन आघाडी उघडली आहे. गेल्या कित्येक दशकांपासून चीनने तैवानी, तिबेटी, उघूर, मंगोलियन तसेच आत्ता हाँगकाँगवासियांवर आपल्या बळाचा वापर केल्याची टीका यावेळी करण्यात आली. चीनमधील कम्युनिस्ट राजवटीच्या कारवाईत हजारो अल्पसंख्यांचा बळी गेल्याचे आरोप या वेबिनारमध्ये तिबेटी, उघूर आणि मंगोलियन प्रतिनिधी व समर्थकांनी केले. चीनच्या या दडपशाही तसेच विस्तारवादाविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारण्यात आंतरराष्ट्रीय समुदायाने फार विलंब केला असून त्याची जबर किंमत येथील गटांना तसेच चीनशेजारी असलेल्या देशांना चुकती करावी लागत आहे, याची वेबिनारमध्ये व्यक्त करण्यात आली.

नेतृत्त्व

अशा परिस्थितीत, चीनमधील राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची राजवट आणि कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधात भारताने तैवान, जपानसारख्या इतर आशियाई देशांना एकत्र आणावे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीविरोधी संघर्षात भारतासारखा लोकशाहीवादी जबाबदार देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे आवाहन या वेबिनारमध्ये करण्यात आले. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच वेबिनार असल्याचा दावा केला जातो. या बैठकीच्या निमित्ताने जगभरात चीनविरोधातील निदर्शने सुरू ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

leave a reply