गलवानमधील शहीदांचे स्मारक उभारुन युद्धसज्ज भारताचा चीनला इशारा

नवी दिल्ली – गलवानच्या खोर्‍यात चीनने चढविलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या २० सैनिकांसाठी भारताने स्मारक उभारले आहे. १६ बिहार रेजिमेंटच्या कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्या सहकार्‍यांसाठी उभारण्यात आलेले हे स्मारक या शहीदांच्या पराक्रमाची व त्याचवेळी चीनने केलेल्या विश्वासघाताची सतत आठवण करुन देत राहणार आहे. याद्वारे भारताने चीनला आणखी एक खरमरीत इशारा दिला असून यापुढे भारताचा विश्वासघात करण्याची संधी चीनला दिली जाणार नाही, असा संदेशही यातून देण्यात येत आहे. याबरोबरच लडाखच्या ‘एलएसी’वर प्रगत क्षेपणास्त्रांसह भारताचे अत्याधुनिक रणगाडे देखील युद्धसज्ज असून युद्ध भडकल्यास भारताच्या रणगाड्यांसमोर चिनी रणगाडे टिकाव धरू शकणार नाहीत, असे दावे भारतीय लष्करी अधिकारी करीत आहेत.

स्मारक

लडाखमध्ये थंडी पडू लागली असून ‘एलएसी’वर तैनात करण्यात आलेल्या चिनी जवानांवर त्याचा परिणामही दिसू लागला आहे. इथल्या प्रतिकुल हवामानाची सवय नसलेले चिनी जवान आजारी पडू लागले आहेत व त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढावली आहे. भारत लडाखच्या ‘एलएसी’वर प्रदिर्घकाळासाठी लष्कर तैनात करील, ही शक्यता चीनने विचारात घेतलेली नव्हती. पण गलवानच्या संघर्षानंतर संतापलेल्या भारताने चीनला हादरविणारे प्रत्युत्तर दिल्याचे दिसत आहे. ‘एलएसी’वर प्रचंड प्रमाणात सैन्य तैनात करुन भारतावर दडपण वाढविता येईल आणि याचा वापर करुन भारताला झुकविता येईल, असा चीनचा भ्रम होता. पण आता भारताने चीनच्या तोडीस तोड लष्करी तैनाती करुन उलट चीनवर दडपण टाकले आहे. २९-३० ऑगस्ट रोजी पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिणेकडील मोक्याची ठिकाणे ताब्यात घेऊन भारतीय लष्कराने चीनला कोंडीत पकडले आहे.

भारताविरोधातील प्रचारयुद्धात चीनच्या बाजूने हिरीरिने लढणारे पाकिस्तानचे लष्करी विश्लेषक देखील लडाखच्या ‘एलएसी’वर भारताची स्थिती चीनपेक्षा खूपच भक्कम असल्याचे मान्य करू लागले आहेत. विशेषत: भारताने ब्रह्मोस, आकाश, निर्भय ही क्षेपणास्त्रे तसेच भीष्म आणि अर्जुन रणगाड्यांसह मॅकेनाईज् इंफंट्री ‘एलएसी’वर तैनात केल्यानंतर चीनची भाषाच बदलली आहे. इथे युद्ध भडकले तर चीनचे रणगाडे भारताच्या भीष्म व अर्जुन रणगाड्यांसमोर तग धरु शकणार नाहीत, असा विश्वास भारतीय लष्करी अधिकारी व्यक्त करीत आहेत. त्याचवेळी चिनी सैनिकांचे मनोधैर्य खचत असल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे सध्यातरी चीन लडाखच्या ‘एलएसी’वरुन सन्मानीय माघार कशी घेता येईल, याच्या विवंचनेत असल्याचे दिसते.

लडाखच्या ‘एलएसी’वर तणाव निर्माण झालेला असतानाच भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांच्या ‘क्वाड’ची बैठक लवकरच जपानमध्ये पार पडणार आहे. यामुळे चीन कमालीचा बेचैन झाला असून राजनैतिक वाटाघाटीच्या मार्गाने सीमावाद सोडविता येईल, असा विश्वास चीन व्यक करीत आहे. त्याचवेळी चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांना चीनविरोधी आघाडी उघडण्याचे स्वप्न पाहू नका, असे बजावत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया व जपान अमेरिकेच्या चीनविरोधी आघाडीत सहभागी होऊच शकणार नाहीत. कारण तसे केल्यास, याची आर्थिक किंमत या देशांना चुकती करावी लागू शकते. त्यामुळे ‘क्वाड’ची चीनविरोधी आघाडी हे अमेरिकेचे अरेबियन नाईट्ससारखे स्वप्न ठरेल, असा दावा ‘ग्लोबल टाईम्स’ने केला आहे.

चीनचे सरकारी मुखपत्र कितीही वल्गना करीत असले तरी, ‘क्वाड’चे सहकार्य चीनला धडकी भरवित असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. विशेषत: अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी नाटोच्या धर्तीवर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांची लष्करी आघाडी उघडण्याचे जाहीर केल्यानंतर चीनची तारांबळ उडाली आहे. याची सामरिक दडपण चीनला जाणवू लागले आहे आणि चीन एकाचवेळी अनेक आघाड्यांवर गुंतल्याचे चीनचा निकटतम मित्रदेश असलेल्या पाकिस्तानातील चीनधार्जिणे विश्लेषक देखील मान्य करीत आहेत. अशा परिस्थितीत, अमेरिका किंवा चीनपैकी एकाची निवड करायची झाली तर काय करायचे, असा सवाल हे पाकिस्तानी विश्लेषक करीत आहेत. चीनसमोरील आव्हाने उग्ररुप धारण करीत असताना, चीनबरोबरील पाकिस्तानच्या मैत्रीची किंमत पाकिस्तानलाही चुकती करावी लागेल की काय, याची भीती पाकिस्तानला सतावू लागल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

leave a reply