संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत दहशतवाद्यांचा बचाव करणाऱ्या चीनवर भारताची टीका

kambojसंयुक्त राष्ट्रसंघ – मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या कारस्थानातील सूत्रधारांपैकी एक असलेल्या अब्दुल रेहमान मक्की याच्यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे निर्बंध लादण्यासाठी भारत व अमेरिकेने संयुक्त प्रस्ताव दिला होता. मात्र जून महिन्यात सुरक्षा परिषदेसमोर आलेला हा प्रस्ताव चीनने रोखला. याचा दाखला देऊन संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी चीनसह पाकिस्तानचेही वाभाडे काढले. दहशतवादाबाबत अशा स्वरुपाचे दुटप्पी धोरण सुरक्षा परिषदेची विश्वासार्हता धोक्यात टाकत असल्याची खरमरीत टीका रुचिरा कंबोज यांनी केली.

गुन्हेगारांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करणाऱ्या ‘सिंडिकेट’चा अनुभव भारताने याआधी घेतलेला आहे, असे कंबोज म्हणाल्या. कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम याचा वापर करून पाकिस्तानने भारतात घातपात घडवून आणले होते. त्यानंतरच्या काळात पाकिस्तान दाऊद इब्राहिमला आपल्या देशात संरक्षण पुरवित आहे, याची जाणीव या सिंडिकेटचा उल्लेख करून कंबोज यांनी करून दिली. सुरक्षा परिषदेतील ‘थ्रेट्स टू इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी कॉज्‌‍ड बाय टेररिस्ट ॲक्टस्‌‍’ या विषयावरील चर्चेत राजदूत रुचिरा कंबोज बोलत होता. चीनच या चर्चेच्या अध्यक्षस्थानी असल्याने कंबोज यांनी पाकिस्तानह चीनवर केलेल्या टीकेचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

खतरनाक दहशतवाद्यांच्या विरोधात सबळ पुराव्यांवर आधारलेला कारवाईचा प्रस्ताव देखील अडवून ठेवला जातो, ही अत्यंत दुर्दैवी बाब ठरते. यामुळे दहशतवादाच्या बाबतीत दुटप्पी धोरण व यावरील राजकारणामुळे सुरक्षा परिषदेची विश्वासार्हता अतिशय खालावलेली आहे, अशी टीका कंबोज यांनी केली. पुढच्या काळात दहशतवादाच्या विरोधात सर्वच देश एकजूट होतील आणि एकमुखाने दहशतवाद्यांवर कारवाईचा निर्णय घेतील, अशी अपेक्षा यावेळी रुचिरा कंबोज यांनी व्यक्त केली. तसेच दहशतवाद्यांवरील कारवाईची प्रक्रिया अधिक पारदर्शक, उत्तरदायी व निष्पक्ष आणि वस्तूनिष्ठ असावी, अशी मागणी कंबोज यांनी केली.

चीनने याआधीही भारतात दहशतवादी हल्ले चढविणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सुरक्षा परिषदेच्या कारवाईपासून बचाव केला होता. 2017 साली ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याच्यावरील सुरक्षा परिषदेच्या कारवाईचा प्रस्ताव चीनने नकाराधिकार वापरून रोखला होता. त्यासाठी चीनने तांत्रिक कारण पुढे केले होते.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक असलेल्या अब्दुल रेहमान मक्की याच्यावरील कारवाईचा प्रस्ताव रोखून चीनने पुन्हा एकदा आपला भारतद्वेष पुन्हा एकदा उघड केल्याचे दिसत आहे. त्याचा दाखला देऊन भारताच्या राजदूतांनी केलेली टीका चीनला इशारा देणारी ठरते आहे.
गेल्या काही महिन्यापासून चीनच्या भारतविरोधी कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे आक्रमक धोरण भारताने स्वीकारले आहे. भारताशी सहकार्य नाकारण्याचे परिणाम चीनला यापुढे सहन करावेच लागतील, याची जाणीव भारत सातत्याने करून देत आहे. सुरक्षा परिषदेत रुचिरा कंबोज यांनी केलेली टीका देखील याचा भाग असल्याचे दिसते.

leave a reply