‘नाम’च्या बैठकीत भारताने पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली – ‘सदस्य देशांनी बैठकीच्या अजेंड्यावर नसलेले मुद्दे मांडणे थांबवावे व असे करण्यापूर्वी किमान विचार करावा. या मुद्यांची संघटनेतील सदस्य देशांकडून दखलही घेतली जात नाही. नाम ही संघटना एका सदस्य देशाकडून दुसऱ्या सदस्य देशाच्या क्षेत्रीय एकात्मतेला धक्का देण्याचे व्यासपीठ नव्हती व यापुढेही नसेल’, अशा कडक शब्दात भारताने पाकिस्तानला फटकारले आहे.

‘अलिप्त राष्ट्र चळवळी’ची (नाम) व्हर्च्युअल बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत पाकिस्तानने नेहमीप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने त्याला खणखणीत प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली.

गेल्याच आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघ व इतर संलग्न व्यासपीठांवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानची भारताने चांगलीच खरडपट्टी काढली होती. मात्र त्यानंतरही पाकिस्तान आपले रडगाणे प्रत्येक व्यासपीठावर गात असल्याचे ‘नाम’च्या बैठकीत स्पष्ट झाले. शुक्रवारच्या बैठकीत, कोरोना साथ व इतर जागतिक आव्हानांचा मुद्दा अजेंड्यावर होता. मात्र पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पॅलेस्टाईन समस्येबाबत बोलताना त्यात काश्मीरचाही उल्लेख केला. कुरेशी यांच्या या आगळीकीला भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी प्रत्युत्तर दिले.

‘नाम जागतिक स्तरावर निर्णायक प्रभाव टाकणारा गट ठरू शकतो. मात्र काहीजणांना फूट पाडणारी शक्ती म्हणून काम करण्यात रस आहे. जर सदस्य देशांनी एकजुटीऐवजी दुही मांडणारे विषय मांडले तर ही चळवळ दोन देशांमधील तक्रारी करण्याची जागा म्हणून मर्यादित राहील. दुसऱ्या देशाला नाराज करणाऱ्या मुद्यावर चर्चा होत राहिली तर आपण कमकुवत व कसलेही महत्त्व नसलेला गट बनून राहू. आपल्याला जागतिक निर्णयप्रक्रियेत काहीही स्थान राहणार नाही’, असे सांगून पाकिस्तानची कृती ‘नाम’साठी चुकीचा पायंडा ठरेल, याची जाणीव भारताने करून दिली.

यावेळी, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानला लक्ष्य केले. पाकिस्तान सरकार आपले अपयश लपविण्यासाठी सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करीत आहे. मात्र भारतासह इतर देशांनीही यावरून पाकिस्तानची चांगलीच कानउघाडणी केल्याने हा देश वारंवार तोंडघशीच पडत असल्याचे दिसत आहे.

leave a reply