दहशतवादाच्या मुद्यावर भारताने पाकिस्तानची खरडपट्टी काढली

जीनिव्हा – संयुक्त राष्ट्रसंघ तसेच राष्ट्रसंघ संलग्न व्यासपीठांवर दरवेळी ‘विक्टीम कार्ड’ अर्थात आपली कातडी वाचविणार्‍या पाकिस्तानची भारताने चांगली खरडपट्टी काढली. दहशतवादाच्या मुद्यापासून जगाचे लक्ष भरकटविण्यासाठी पाकिस्तान दरवेळी आपण दहशतवादाचे बळी ठरल्याची बतावणी करतो, अशी घणाघाती टीका भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाच्या बैठकीत केली. भारतात मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा आरोप करणार्‍या पाकिस्तानने आधी आपल्या देशातील मानवाधिकारांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावे, असेही भारताने फटकारले.

खरडपट्टी

काही तासांपूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकाराच्या बैठकीत पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचे तुणतूणे वाजवून भारतावर खोटे आरोप लगावले होते. या आरोपांवर ‘प्रत्युत्तराचा अधिकार’ (राईट टू रिप्लाय) वापरुन राष्ट्रसंघातील भारताचे फर्स्ट सेक्रेटरी विमर्श आर्यन यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला. यासाठी आर्यन यांनी पाकिस्तानातील घटनांचा दाखला दिला. दहशतवादाचा बळी म्हणून स्वत:ला जगासमोर पेश करणारा पाकिस्तान हा लबाड देश असल्याचे ताशेरे आर्यन यांनी ओढले. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी आणि दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले बहुतांश दहशतवादी पाकिस्तानातच आहेत. पाकिस्तानने या दहशतवाद्यांना उघडपणे आश्रय दिला असून पाकिस्तानची राजवट त्यांचा वापरही करीत आहे. तरीही जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दहशतवादाचा मुद्दा निघतो, तेव्हा पाकिस्तान आपणच याचे बळी ठरलो आहोत, असे सांगून जगाचे लक्ष मुळ मुद्द्यापासून भरकटविण्याचा प्रयत्‍न करतो, याची आठवण आर्यन यांनी करुन दिली.

यानंतर फर्स्ट सेक्रेटरी आर्यन यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्यांक, महिला, मुले आणि पत्रकारांवर होत असलेल्या अत्याचाराचा उदाहरणासह पाढा वाचला. अल्पसंख्यांकांचा मुद्दा येतो तेव्हा मध्ययूग कालिन मानसिकता असलेला पाकिस्तान समतावादाचे मुल्य जोपासणार्‍या भारतावर दोषारोप करतो. पण त्याचवेळी हा देश असिफ परवेझ या अल्पसंख्यांकाच्या समुदायातील तरुणाला जूल्मी कायदाचा वापर करुन दिलेल्या फाशीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. तर महिलांचे अधिकार सुरक्षित ठेवणार्‍या भारतासारख्या लोकशाही जोपासणार्‍या देशावर चिखलफेक करणारा पाकिस्तान आपल्याच देशातील परशा कुमारी या हिंदू महिलेच्या जबरदस्तीने झालेल्या धर्मांतरणाकडे कानाडोळा करतो. भारतासारख्या स्वतंत्र देशातील पत्रकारांच्या स्थितीवर खोटेनाटे आरोप करणारा पाकिस्तान बिलाल फारूकी सारख्या प्रामाणिक पत्रकाराला अटक करुन त्याचा छळ करतो, याची आठवण आर्यन यांनी करुन दिली.

गेल्या आठवड्यातही संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकारांच्या बैठकीत भारताने पाकिस्तान सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेला देश असल्याची टीका केली होती. त्याचबरोबर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी स्वत:हून आपल्या देशात दहशतवादी असल्याचे मान्य केले होते, याकडे भारताने लक्ष वेधले होते.

leave a reply