भारताने अमेरिकेच्या ‘एमक्यू-९’ ड्रोन्सच्या खरेदी व्यवहाराला गती दिली

नवी दिल्ली – इराक, अफगाणिस्तान, सिरिया, येमेनमधील संघर्षात प्रभावी ठरलेल्या अमेरिकेच्या ‘एमक्यू-९’ ड्रोन्सच्या खरेदीचे व्यवहाराला भारताने वेग दिला आहे. अमेरिकेबरोबरच्या या तीन अब्ज डॉलर्सच्या ड्रोन खरेदी करारांतर्गत भारत ३० ‘एमक्यू-९’ खरेदी करणार असून यापैकी सहा ड्रोन्स तातडीने संरक्षणदलांमध्ये सामील केले जातील. हा करार भारतासाठी ‘गेंम चेंजर’ ठरणार असल्याचा विश्वास नौदल अधिकारी व्यक्त करीत आहेत.

'एमक्यू-९'

‘एमक्यू-९’ या ड्रोन्सच्या खरेदीसंर्दभात उभय देशांच्या संरक्षणदलामध्ये काही महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. यामध्ये ‘एमक्यू-९’ ड्रोन्सच्या खरेदी प्रक्रियेचा वेग वाढला आहे. लवकरच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली ‘डिफेन्स एक्विझिशन कौन्सिल’ची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत उपस्थित असतील. यावेळी सदर करारासंर्दभात अंतिम निर्णय होईल. भारत व अमेरिकेतील या महत्त्वाच्या कराराचे दोन टप्प्यात वर्गीकरण केले जाईल.

करार झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यातच तातडीने अमेरिकेकडून सहा ‘एमक्यू- ९’ ड्रोन्स खरेदी केली जातील. तीन महिन्यांच्या कालावधीत भारताला अमेरिकेकडून हे ड्रोन्स मिळतील, असे बोलले जाते. यापैकी प्रत्येकी दोन ड्रोन्स लष्कर, नौदल आणि वायुसेनेत तैनात केले जातील. तर उरलेले २४ ड्रोन्स तीन वर्षांमध्ये खरेदी करुन त्यांचा तीनही संरक्षणदलात समावेश केला जाईल, असे माध्यमांनी म्हटले आहे. त्यामुळे ‘एमक्यू-९’ ड्रोन्सच्या ‘फॅमिली’तील प्रत्येकी दहा ड्रोन्स भारताच्या लष्कर, नौदल व वायुसेनेत सहभागी होणार आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून भारत अमेरिकामध्ये ‘एमक्यू-९’ ड्रोन्सच्या कराराविषयी चर्चा होती. २०१७ साली भारतीय नौदल ‘एमक्यू-९’च्या २२ ‘सी गार्डियन’ची आवृत्ती खरेदी करणार होते. पण २०१८ साली अमेरिकेने ‘एमक्यू-९’ ड्रोन्सची लष्करी आवृत्ती भारताला पुरविण्याची तयारी दाखविली होती. त्यानंतर भारताने त्याच्या खरेदीची प्रक्रिया सुरू होती. काही दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिकेत पार पडलेल्या ‘टू प्लस टू’ चर्चेतही हा मुद्दा होता, असे वृत्त आहे.

जानेवारी महिन्यात अमेरिकेने इराणच्या जनरल कासेम सुलेमानी यांना ठार करण्यासाठी या ड्रोन्सचा वापर केल्यानंतर ‘सुलेमानी किलर’ अशी या ड्रोन्सची ओळख झाली. या ‘एमक्यू-९’ ड्रोन्समध्ये ‘इलेक्ट्रो ऑप्टिकल / इन्फ्रा-रेड मल्टी-मोड रडार’, ‘मल्टी-मोड मेरिटाईम सर्व्हीलन्स रडार’, ‘लेझर डिझीग्नेटर’ इत्यादी वाहून नेण्याची क्षमता आहे. हे ड्रोन ‘पी ८आय पोसायडान’ आणि ‘एमएच ६० आर मल्टी रोल’ हेलिकॉप्टर्सहून घातक मानले जातात. या ड्रोन्सच्या माध्यमातून हिंदी महासागर क्षेत्रातील पाणबुड्या आणि विनाशिकांचा माग काढणे सोपे जाईल. ‘एमक्यू-९’ ड्रोनमध्ये ४५ हजार फूटावरुन लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. सलग ३५ तास हे ड्रोन्स हवेत उड्डाण करू शकतात. एडनचे आखात, मलाक्काचे आखात ते लडाखच्या क्षेत्रापर्यंत हे ड्रोन शत्रूचा माग काढतील व आपले लक्ष्य टिपतील, असे संरक्षणदलाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

leave a reply