नवाज शरीफ यांच्या मर्मभेदी टीकेमुळे पाकिस्तानचे लष्कर अस्वस्थ

इस्लामाबाद – माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्करावर घणाघाती टीका केल्यानंतर या देशाच्या राजकारणात फार मोठ्या उलथापालथी सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने ३३ वर्ष या देशावर राज्य केले आणि उरलेल्या काळात कुठल्याही लोकशाही नियुक्त सरकारला धडपणे काम करू दिले नाही, असा आरोप करून नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्करावर तोफ डागली होती. त्यावर लष्कराची जहाल प्रतिक्रिया उमटू लागली आहे. नवाज शरीफ यांचे भाषण प्रसारित करण्याचा आदेश कोणाला विचारून दिलात, असा जाब पाकिस्तानी लष्कराने पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारला विचारल्याचे काही पत्रकारांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानची गुप्तचर संघटना ’आयएसआय’ने विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत, अशाही बातम्या येत आहेत.

नवाज शरीफ

आजवर पाकिस्तानातील लष्कराला जगभरात ‘स्टेट विदिन इन द स्टेट’ अर्थात ‘देशात अस्तित्वात असलेला स्वतंत्र देश’ असे म्हटले जायचे. पण आता पाकिस्तानच्या लष्कराचे वर्चस्व इतक्या प्रमाणात वाढले आहे की आता पाकिस्तानी लष्कर म्हणजे ‘स्टेट अबाउ स्टेट’ बनले आहे, असा मर्मभेदी प्रहार नवाज शरीफ यांनी केला. पाकिस्तानचे लष्कर देशापेक्षा मोठे बनले आहे, ही नवाज शरीफ यांनी केलेली टीका पाकिस्तानच्या लष्कराला चांगलीच झोंबली आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानी लष्कराच्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधून त्याच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल यावेळी नवाज शरीफ यांनी केला. शरीफ यांच्या भाषणाचे केवळ पाकिस्तानातच नाही तर जगभरात पडसाद उमटले व आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही याची दखल घेतली. यामुळे पाकिस्तानचे लष्कर अधिकच संतापले आहे.

नवाज शरीफ यांचे हे भाषण प्रसारित करू नका, अशा सूचना पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांना सरकारतर्फे देण्यात आल्या होत्या. तरीही त्यांचे हे भाषण प्रसारित करण्यात आले, यामागे पंतप्रधान इम्रान खान यांचा हात असल्याचे सांगितले जाते. नवाज शरीफ काय बोलणार, याची कल्पना इम्रान खान यांना आली होती. या भाषणात ते आपल्यावर टीका न करता पाकिस्तानच्या लष्करावर राळ उठवतील, याची माहिती इम्रान खान यांना आधीच मिळाली होती. म्हणूनच त्यांनी हे भाषण वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्याची अनुमती दिली, असा दावा पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार नजम सेठी यांनी केला आहे. नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केल्यास, त्यांच्यावरील देशद्रोहाचा आरोप अधिक आक्रमकतेने लगावता येईल, शिवाय आपली लष्कराबरोबरची जवळीक अधिकच वाढेल, असा तर्क लढवून इम्रान खान यांनी ही राजकीय खेळी केली, असे सेठी यांचे म्हणणे आहे.

नवाज शरीफ

मात्र यामुळे पाकिस्तानचे लष्कर अधिकच संतापले असून याप्रकरणी पाकिस्तानी लष्कराने इम्रान खान यांच्या सरकारला जाब विचारल्याचे वृत्त आहे. कुणाला विचारून नवाज शरीफ यांचे भाषण प्रसारित होऊ दिलेत, असे लष्कराने पाकिस्तानच्या सरकारला खडसावल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. त्याचवेळी पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ने विरोधी पक्षनेत्यांच्या गुप्तपणे भेटीगाठी सुरू केल्याचेही बातम्या येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानचे लष्कर पंतप्रधान इम्रान खान यांच्या कारभारावर नाराज ठेवून आहेत. राजकीय, आर्थिक आणि परराष्ट्र धोरण अशा सर्वच आघाड्यांवर इम्रान खान यांचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्याच वेळी अशा नालायक सरकारला सत्तेवर येण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने खूप मोठे सहाय्य केले, हा आरोपही आता अधिकच जोर पकडू लागला आहे. नवाज शरीफ यांनी आपल्या भाषणात आपला वाद इमरान खान यांच्याशी नसून त्यांच्यासारख्या अयोग्य व्यक्तीला सत्तेवर आणणार्‍यांशी आपला वाद असल्याचे शरीफ म्हणाले होते. इम्रान खान यांचे अपयश पाकिस्तानच्या लष्कराच्या मुळावर येत असून नवाज शरीफ यांच्यासारखा हुशार राजकीय नेता त्याचा पुरेपूर लाभ घेत आहे, असे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लष्कराची अस्वस्थता अधिकच वाढली आहे.

नवाज शरीफ यांच्या भाषणानंतर पाकिस्तानी लष्कराचे बगलबच्चे मानले जाणारे पत्रकार त्यांच्यावर तुटून पडले आहेत. या भाषणाद्वारे नवाज शरीफ यांनी आपले राजकीय भवितव्य पणाला लावले व आता त्यांचा प्रवास अल्ताफ हुसेन यांच्या दिशेने सुरू झाला, अशी टीका हे लष्करधार्जिणे पत्रकार करू लागले आहेत. तसेच नवाज शरीफ ‘रॉ’चे एजंट असल्याचा आरोपही सुरू झाला आहे. पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन करण्यासाठी नवाज शरीफ यांच्या भाषणाचा वापर भारताकडून केला जाऊ शकतो, असा दावा लष्कराशी एकनिष्ठ असलेली पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत. त्याचवेळी काही तटस्थ पत्रकार नवाज शरीफ यांच्या भाषणावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, असे जनतेला बजावत आहेत. पाकिस्तानी लष्कराने राजकारणात हस्तक्षेप करू नये, अशी अपेक्षा शरीफ यांनी व्यक्त केली, तर त्यात काय चुकीचे आहे असा प्रश्न हे पत्रकार करीत आहेत.

leave a reply