इंधन सुरक्षेसाठी भारताने हालचाली वाढविल्या

नवी दिल्ली – केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फिनलँडच्या राजदूत रिवा कौक्कू यांच्याबरोबर इंधन सहकार्यावर चर्चा केली. त्याआधी पेट्रोलियममंत्र्यांची ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांबरोबरही इंधन सहकार्याच्या विविध बाजूंवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. भारत आपल्या इंधन सुरक्षेच्या दृष्टीने विविध देशांशी सतत चर्चा करीत आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रधान यांनी भारत अमेरिकेसह इतर देशातही स्टॅटेजिक इंधनसाठा करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली होती. तसेच भारत आपल्या पारंपारिक इंधन पुरवठादार देशांबरोबर इतर देशातूनही इंधन आयात करण्यावर भर देत आहे. सध्या भारत एकूण ३० हुन अधिक देशांमधून इंधन आयात करत असल्याचे प्रधान यांनी अधोरेखित केले होते.

इंधन सुरक्षा

नुकत्याच पार पडलेल्या ‘एनर्जी सिक्युरिटी टूवर्ड्स आत्मनिर्भर भारत’ या परिषदेत पेट्रोलियमंत्री सहभागी झाले होते. यावेळी भारत इंधन सुरक्षेसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. भारत आणि अमेरिकेत दरम्यान आपत्कालीन इंधन साठ्यासाठी १७ जुलै रोजी प्राथमिक करार पार पडला होता. यानुसार अमेरिकेत इंधन तेलाचासाठा करण्यासाठी शक्यता तपासल्या जात आहेत. देशाकडे सध्या ५३ लाख टन स्टॅटेजिक इंधन साठवण्याची भूमीगत व्यवस्था आहे. याशिवाय ही क्षमता आणखी ६५ लाख टनाने वाढविण्यासाठी दोन प्रकल्पांना तात्वीक मजुरी देण्यात आली आहे, असे प्रधान म्हणाले. या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रधान यांनी गुंतवणूकदारांना आमंत्रित केले आहे.

भारत आवश्यकतेच्या ८५ टक्के इंधन आयात करतो. गेल्या आर्थिक वर्षात दहा कोटी १४ लाख टन इंधन तेल भारताने आयात केले होते. त्यातील दोन तृतीयांश इंधन सौदी अरेबिया संयुक्त अरब अमीरात इराक सारख्या आखाती देशातून आयात करण्यात आले होते. मात्र भारत आखाती देशांबरोबर इतर देशांमधून होणारी इंधन आयात वाढवीत आहे. अमेरिका, रशिया, अंगोला आदी देशांबरोबर भारतीय कंपन्यांनी दीर्घ मुदतीचा करार केले आहेत. याशिवाय आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील देशांकडूनही भारत इंधन आयात करू लागला असून भारताला इंधन पुरवठा करणाऱ्या देशांची संख्या ३० च्या पुढे गेली आहे, असे प्रधान यांनी म्हटले होते.

यापार्श्वभूमीवर, फिनलँडच्या राजदूत आणि ऑस्ट्रोलियाच्या राजदूताबरोबर प्रधान यांची इंधन सहकार्यावर झालेली बैठक महत्वाची ठरते. आसाममध्ये नुमलीगड येथे बांबूचा वापर करून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प फिनलँडच्या कंपनीबरोबर संयुक्तरित्या उभारला जात आहे. यावर फिनलँडच्या राजदूतांनाबरोबरील बैठकीत चर्चा पार पडल्याचे सांगण्यात येते. जगात अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओफ्ररेल यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत इंधन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याच्या विविध शक्यता तपासण्यात आल्या. भारताच्या इंधनवायू क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी गुंतवणुकीवर आणि हायड्रोकार्बनच्या पुरवठ्यावर चर्चा करण्यात आल्याचे वृत्त आहे.

leave a reply