‘आयएस’ पाकिस्तानच्या संरक्षणाखाली दक्षिण आशियात विस्तार करीत आहे

- युरोपिय अभ्यासगटाचा इशारा

जीनिव्हा – इराक आणि सिरियातील ‘आयएस’ची सद्दी संपुष्टात आली असली तरी या दहशतवादी संघटनेने दक्षिण आशियात आपला प्रभाव वेगाने वाढविला आहे. ‘आयएस’च्या या वाढत्या प्रभावासाठी पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ सहाय्य करीत असल्याचा इशारा युरोपातील आघाडीच्या अभ्यासगटाने दिला. ‘आयएस’मधील ७० टक्के दहशतवादी पाकिस्तानी असून यात ‘हक्कानी नेटवर्क’, ‘जमात-उल-दवा’ आणि ‘लश्‍कर-ए-तोयबा’ या संघटनांमधून आलेल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेने ‘आयएस’ची घट्ट पकड घेतल्याचा दावा या अभ्यासगटाने केला. भारताच्या जम्मू-काश्मीर आणि अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएस’चा वापर करीत असल्याचा आरोपही युरोपिय अभ्यासगटाने केला.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ४५ व्या मानवाधिकार संघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने युरोपिय अभ्यासगट ‘युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशिया स्टडिज्’ने (यूएफएसएएस) एका वेबिनारचे आयोजन केले होते. यावेळी युरोपिय अभ्यासगटातील निरिक्षकांनी दक्षिण आशियातील ‘आयएस’च्या वाढत्या प्रभावाचा धोका, यावर चर्चा केली. अमेरिकेच्या लष्करी कारवाईमुळे ‘आयएस’चा इराक आणि सिरियातील प्रभाव कमी झाल्यानंतर सदर दहशतवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट-खोरासन प्रोव्हिंस’ (आयएसकेपी) या नावाने दक्षिण आशियात सक्रिय झाली आहे. अफगाणिस्तान व पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचे प्रभावक्षेत्र आहे. अमेरिकेची तालिबानबरोबरील शांतीचर्चा त्याचबरोबर अफगाणिस्तानातील सैन्य माघारीच्या पार्श्वभूमीवर ‘आयएस’चा वाढता प्रभाव चिंताजनक असल्याचा दावा युरोपिय अभ्यासगटातील वरिष्ठ निरिक्षक टिमोथी फॉक्सले यांनी केला.

सध्या या ‘आयएसकेपी’मध्ये दोन ते तीन हजार दहशतवादी असल्याचा दावा केला जातो. यातील ७० टक्के दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती अमेरिकी लष्करानेच याआधी दिली होती, याची आठवण फॉक्सले यांनी करुन दिली. त्यातही हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांना ‘आयएस’मध्ये अधिक प्रमाणात भर्ती करण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा प्रयत्‍न करीत असल्याचा दावा युरोपिय अभ्यासगटाने केला. सध्या हक्कानी नेटवर्क व्यतिरिक्त ‘जमात’ आणि ‘लश्कर’चे दहशतवादी ‘आयएस’मध्ये सहभागी होत असून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून आपला अजेंडा राबवित असल्याचा आरोप युरोपिय अभ्यासगटाने केला.

गेल्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्तान आणि भारतात ‘आयएस’ने चढविलेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्क आणि लश्कर-ए-तोयबा असल्याचा ठपका या अभ्यासगटाने ठेवला. या हल्ल्यांमधील ‘आयएस’ आणि ‘हक्कानी’ किंवा ‘लश्कर’ची मोडस आपरेंडी अर्थात कामाची पद्धत एकसमान असल्याचेही या अभ्यासगटाने निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर पाकिस्तानी गुप्तचर संघटनेनेच ‘आयएस’ आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना शस्त्रसाठा पुरविल्याचा आरोप याआधी झाला होता, हे युरोपिय अभ्यासगटाने लक्षात आणून दिले. अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी याआधीच ‘आयएस’ आणि ‘आयएसआय’मध्ये असलेल्या सहकार्याबाबत केलेल्या आरोपांचा दाखला या अभ्यासगटाने दिला आहे.

leave a reply