अफगाणिस्तानमधील आत्मघाती स्फोटात नऊ जणांचा बळी

काबूल – बुधवारी अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील हेल्मंड प्रांतात पोलीस चौकीजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात नऊ जणांचा बळी गेला. यामध्ये सुरक्षा दलाचे पाच जवान आणि चार नागरिकांचा समावेश आहे. हेल्मंड प्रांतावर तालिबानचे वर्चस्व असल्यामुळे हा हल्ला तालिबाननेच घडविल्याचा संशय आहे. कतारमध्ये अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये शांतीचर्चा सुरु झाल्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबानचे हल्ले वाढले आहेत.

नऊ जणांचा बळी

बुधवारी संध्याकाळी हेल्मंड-कंदहार महामार्गावर सुरक्षा चौकीला लक्ष्य करुन आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्याच्या काही तास आधी तालिबानने अफगाणिस्तानच्या बघलान प्रांतात सुरक्षा दलाला लक्ष्य करुन चढविलेल्या हल्ल्यात एका पोलिसाचा बळी गेला असून दोन जण जखमी झाले आहेत. यावेळी तालिबानने पोलिसांची वाहने पेटवून दिल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसात अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यात अफगाणी सुरक्षादलाच्या ७० हून अधिक जवानांचा बळी गेल्याचे सांगितले जाते. अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये शांतीचर्चा सुरु झाल्यापासून अफगाणिस्तानच्या ३४ पैकी २४ प्रांतात तालिबानने हल्ले घडविले आहेत. तर अफगाणिस्तानच्या सुरक्षादलाने तालिबान विरोधातली कारवाई तीव्र केल्याचे दिसत आहे. या वाढत्या संघर्षामुळे अफगाणिस्तान आणि तालिबानमधील शांतीचर्चेत प्रगती होत नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply