भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ग्रीसचा दौरा करणार

नवी दिल्ली/अथेन्स – भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर या महिन्याच्या अखेरीस ग्रीसच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ग्रीसच्या परराष्ट्र मंत्रालयाने याची माहिती दिली. गेल्या काही वर्षात तुर्की व पाकिस्तानची जवळीक वाढत असताना भारतीय परराष्ट्रमंत्र्यांचा हा दौरा लक्ष वेधून घेणारा ठरतो. काही दिवसांपूर्वीच भारत व ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये व्हर्च्युअल बैठकही पार पडली असून, त्यात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याच्या मुद्यावर चर्चा झाली होती.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ग्रीसचा दौरा करणारतुर्की-पाकिस्तान सामरिक सहकार्य व त्या आधारावर घट्ट होणाऱ्या आघाडीला शह देण्यासाठी ग्रीसने भारताबरोबर असलेले सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या महिन्यात अवघ्या १० दिवसांच्या अवधीत ग्रीसच्या संरक्षण व परराष्ट्रमंत्र्यांनी भारताशी चर्चा केली होती. ग्रीक संरक्षणमंत्र्यांनी भारताबरोबर संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य विकसित होऊ शकते, असे संकेत दिले होते. तर ग्रीसमधील विश्लेषकांनी, तुर्कीबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताला भूमध्य सागरी क्षेत्रात संयुक्त नौदल सरावासाठी निमंत्रण द्यावे, अशी मागणीही केली होती.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ग्रीसचा दौरा करणारभारतीय परराष्ट्रमंत्र्यांचा ग्रीस दौरा हा दोन देशांमधील वाढत्या सहकार्याचा पुढचा टप्पा ठरतो. भारताने यापूर्वी सायप्रसच्या मुद्यावर ग्रीसला समर्थन दिले असून तुर्कीबरोबरील वादातही ग्रीसची बाजू उचलून धरली आहे. गेल्या महिन्यातील व्हर्च्युअल बैठकीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ग्रीस व तुर्कीमधील वाद संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांच्या चौकटीतच सुटू शकतो, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. ग्रीसनेही संयुक्त राष्ट्रसंघात सातत्याने भारताला पाठिंबा दिला असून, स्थायी सदस्यत्वासाठी समर्थनाची ग्वाही दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी राजनैतिक बैठका व चर्चा व्हर्च्युअल पातळीवरच पार पाडण्यावर भर दिला होता. अशा वेळी ग्रीसने भारतीय परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी पुढाकार घेणे लक्षवेधी ठरते. या दौऱ्यात, एस. जयशंकर ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांसह इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत, द्विपक्षीय सहकार्याबरोबरच क्षेत्रिय हितसंबंध, भूमध्य सागरी क्षेत्र तसेच दक्षिण आशियाशी संबंधित मुद्यांवर चर्चा होईल, अशी माहिती ग्रीसच्या परराष्ट्र विभागाने दिली आहे. द्विपक्षीय चर्चेत दोन देशांच्या लष्करामध्ये असलेले संबंध दृढ करणे आणि संरक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य या मुद्यांवर भर देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

leave a reply