भारताकडून आफ्रिका खंडाचा विश्वासु व भक्कम भागीदार बनण्याची ग्वाही

नवी दिल्ली – भारत हा आफ्रिका खंडासाठी विश्वासु व भक्कम भागीदार ठरेल, अशी ग्वाही भारताने दिली आहे. ‘सीआयआय’ व ‘एक्झिम बँके’ने आयोजित केलेल्या बैठकीत, भारताने कोरोना साथीदरम्यान केलेल्या सहाय्याचा दाखला देऊन, आफ्रिकेत शांतता व समृद्धीसाठी भारत-आफ्रिका एकत्र येऊन काम करू शकतात, असा दावाही केला. गेल्या दोन दशकात चीनने आफ्रिका खंडात मोठी गुंतवणूक करून आपला प्रभाव वाढविण्यात यश मिळविले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या या वर्चस्वाला धक्के बसत असून, भारत आपले स्थान मजबूत करण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे.

भारताकडून आफ्रिका खंडाचा विश्वासु व भक्कम भागीदार बनण्याची ग्वाहीभारतातील उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज'(सीआयआय) व ‘एक्झिम बँक’ यांनी ‘डिजिटल कॉनक्लेव्ह इंडिया-आफ्रिका प्रोजेक्ट पार्टनरशिप’चे आयोजन केले होते. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तसेच व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल सहभागी झाले होते. भारताचे आफ्रिकेतील प्रकल्प हे त्या खंडातील जनतेचा गैरफायदा उचलणारे नसून, उलट त्यांना अधिक सक्षम बनविणारे आहेत, या शब्दात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नाव न घेता चीनला टोला लगावला. त्याचवेळी भारताकडून आफ्रिकी देशांमध्ये उभारण्यात येणाऱ्या सुविधा व गुंतवणूक आफ्रिकेच्या शाश्वत विकासाची काळजी घेणारी असल्याची ग्वाहीदेखील जयशंकर यांनी दिली.

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सागरी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून हे क्षेत्र दोन्ही बाजूंमधील सहकार्याची नवी आघाडी ठरू शकते, असे संकेत दिले. काही दिवसांपूर्वीच भारताला, आफ्रिकी व आखाती देशांचा सहभाग असलेल्या ‘जिबौती कोड ऑफ कंडक्ट/जेद्दा अमेंडमेंट’मध्ये (डिसीओसी/जेए) निरीक्षक देश म्हणून सहभागी करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिलेले संकेत महत्त्वाचे ठरतात. आफ्रिकेबरोबर प्रामाणिक भागीदारी करण्याची भारताची इच्छा असून त्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला.

भारताकडून आफ्रिका खंडाचा विश्वासु व भक्कम भागीदार बनण्याची ग्वाहीयावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी, भारताने आफ्रिकेत केलेली गुंतवणूक तसेच प्रकल्पांची माहिती देऊन, भारत हा आफ्रिका खंडाचा सर्वात भक्कम भागीदार असल्याचे सांगितले. ‘आतापर्यंत भारताने आफ्रिका खंडातील ३७ देशांमध्ये १९४ विकास प्रकल्प राबविले आहेत. त्याचवेळी सध्या २९ देशांमध्ये ११ अब्ज डॉलर्स मूल्याचे ७७ प्रकल्प सुरू आहेत. त्यात पायाभूत सुविधा, ऊर्जा, पाणी, शेती व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योजनांचा समावेश आहे. भारताने आफ्रिका खंडात एकूण ५४ अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे’, या शब्दात जयशंकर यांनी दोन बाजूंमधील वाढत्या सहकार्याकडे लक्ष वेधले.

व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आफ्रिका खंडातील मुक्त व्यापार क्षेत्राचा उल्लेख करून यामुळे भारताला अधिक संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. आफ्रिका खंडातून आयात होणाऱ्या ९८ टक्के आयातीवर कर नसल्याकडे लक्ष वेधून आफ्रिकी उत्पादनांना भारतात मोठ्या प्रमाणात वाव असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले. आफ्रिका खंडात भारत जपानच्या सहकार्याने प्रकल्प राबवित असून यासंदर्भातील एक अहवालही यावेळी प्रसिद्ध करण्यात आला.

leave a reply