युरोपमधील आगामी काळातील संघर्षासाठी अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’चा पहिला सराव

बर्लिन – दोन वर्षांपूर्वीच प्रस्थापित झालेल्या अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’ कमांडने पहिलावहिला संयुक्त युद्धसराव पार पडला. यामध्ये ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या तीन मित्रदेशांचा समावेश होता. येत्या काळात पूर्व युरोपमध्ये रशियाबरोबरील युद्धाची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत, भविष्यात अंतराळातून संभवणाऱ्या युरोपमधील धोक्यांचा सामना करण्याचा सराव करण्यात आला. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेने स्पेस फोर्सच्या स्थापनेला महत्त्व दिले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने दक्षिण कोरियामध्ये स्पेस फोर्सचा पहिला तळ सुरू केला होता.

‘स्पेस ट्रेनिंग अँड रेडिनेस कमांड-एसटीएआर’ने (स्टार) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि मित्रदेशांमधील ‘स्पेस फ्लॅग 23-1’ सराव नुकताच पार पडला. अमेरिकेच्या कोलारॅडो येथील श्रिवर स्पेस फोर्स तळावर हा सराव आयोजित करण्यात आला होता. अमेरिकेच्या युरोपियन कमांडच्या क्षेत्रातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, या सरावाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘ऑर्बिटल’ अर्थात कक्षीय युद्धतंत्र, इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र, अंतराळ क्षेत्रासंबंधी जागरुकता आणि इंटेलिजन्स कमांड, या प्रत्येक क्षेत्रासाठी दोन दिवसांचा सराव करण्यात आला.

यावेळी युरोपियन कमांडमधील अमेरिका व मित्रदेशांच्या सुरक्षेसंबंधी असलेल्या आव्हानांचा विचार करण्यात आल्याची माहिती स्पेस फोर्स लेफ्टनंट कर्नल अल्बर्ट हॅरिस यांनी दिली. येत्या काळात युरोपमध्ये युद्ध भडकलेच तर येथील अमेरिकेच्या स्पेस फोर्स कमांडवरील जबाबदारी व त्यानंतरची कारवाई याचा अभ्यास या सरावात केल्याचे लेफ्टनंट कर्नल हॅरिस यांनी स्पष्ट केले. फेब्रुवारी महिन्यापासूनच या युद्धसरावाच्या आयोजनाची तयारी करण्यात आली होती, असे हॅरिस पुढे म्हणाले.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केल्यानंतर अमेरिकेच्या स्पेस फोर्सचा हा युद्धसराव लांबणीवर पडला होता. पण या काळात युरोपच्या सुरक्षेला असलेल्या धोक्यांवर लक्ष केंद्रीत करणे सोपे झाले. युरोपकेंद्री धोके तसेच या धोक्यांचा सामना करण्याची तयारी यांना या सरावात महत्त्व देण्यात आले. अंतराळातील युद्ध जिंकणे ही अमेरिका व मित्रदेशांची संयुक्त जबाबदारी ठरते, असा दावा कर्नल जेस श्रॅम यांनी केला.

दरम्यान, गेल्या दहा महिन्यांपासून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सॅटेलाईट्स आणि त्यावर आधारलेल्या यंत्रणांचे महत्त्व वाढले आहे, असा दावा अमेरिकेच्या स्पेस फोर्सच्या ऑपरेशन्सचे प्रमुख जनरल बी. चान्स स्टाल्ट्झमन यांनी तीन आठवड्यांपूर्वी केला होता. युक्रेनमध्ये अत्याधुनिक युद्ध खेळले जात असून भविष्यातील युद्धात अंतराळ क्षेत्रातील हितसंबंधांची सुरक्षा महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावा जनरल स्टाल्ट्झमन यांनी केला होता. त्याचबरोबर अंतराळ व त्याची सुरक्षा कुणीही नाकारू शकत नसल्याचे स्टाल्ट्झमन यांनी लक्षात आणून दिले होते.

leave a reply