चीनमधील अमेरिकी नागरिकांवर कारवाई होण्याचा धोका

- अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचा इशारा

वॉशिंग्टन – सध्या चीनमध्ये असणाऱ्या अमेरिकी नागरिकांवर कधीही व कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ शकते असा सावधगिरीचा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिला आहे. कारवाईनंतर या अमेरिकी नागरिकांना अमेरिकी दूतावासाचे सहाय्य अथवा इतर कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत नाकारली जाऊ शकते, असेही परराष्ट्र विभागाच्या इशाऱ्यात बजावण्यात आले आहे. अमेरिका व चीन मधील संबंध विकोपाला गेल्याचे संकेत मिळत असतानाच देण्यात आलेला हा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियानेही आपल्या नागरिकांना चीनमध्ये वावरताना दक्षता बाळगावी, असा सावधगिरीचा सल्ला दिला होता.

America-China‘चीनमधील अमेरिकी नागरिकांना कोणत्याही कारणाने अटक केली जाऊ शकते. अटक केलेल्या नागरिकांना अमेरिकी दूतावासाने सहाय्यही मिळू दिले जाणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून अटक केलेल्या अमेरिकी नागरिकांची दीर्घकाळ चौकशी होऊ शकते व त्यांना अनेक दिवसांकरता तुरुंगात डांबले जाऊ शकते. चीन अथवा चीनच्या राजवटीशी संबंधित माहिती संदेशाच्या रूपात बाहेर पाठवल्याच्या कारणावरून अमेरिकी नागरिकांना तुरुंगवास होऊ शकतो किंवा त्यांच्या हकालपट्टीच्या घटनाही घडू शकतात’, असा स्पष्ट सावधगिरीचा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या चीनमधील नागरिकांना दिला.

गेल्या काही महिन्यात अमेरिका व चीन मधील तणाव चांगलाच चिघळला आहे. यामागे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना साथीच्या मुद्द्यावरून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात सुरू केलेली आक्रमक मोहीम हे प्रमुख कारण ठरले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह प्रशासनातील अनेक वरिष्ठ नेते व अधिकाऱ्यांनी सातत्याने चीनच्या सत्ताधारी राजवटीला धारेवर धरले आहे. कोरोना साथीबरोबरच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवाया, हॉंगकॉंगवर लादलेला सुरक्षा कायदा, उघुरवंशीयांवरील अत्याचार, हेरगिरी, सायबरहल्ले ह्या मुद्द्यांवरून चीनला लक्ष्य करण्यात आले आहे. अमेरिकेची संसद व प्रशासनाने चीनविरोधातील कारवायांचा धडाका लावला असून दोन देशांमधील राजनैतिक संघर्ष आता शीतयुद्धाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचल्याचे मानले जाते.

America-Chinaकाही दिवसांपूर्वीच ट्रम्प प्रशासनाने चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसह तीन इतर अधिकाऱ्यांवर मोठे निर्बंध लादल्याची घोषणा केली होती. चीनच्या सत्ताधारी राजवटीतील सर्वोच्च नेत्यांपैकी एखाद्या नेत्याला लक्ष्य करण्याची ही पहिलीच मोठी कारवाई मानली जाते. ही कारवाई होत असतानाच अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चिनी ॲप्सवर बंदी टाकण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचेही संकेत दिले होते. त्यानंतर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लवकरच चीनविरोधात मोठ्या कारवाईची घोषणा करतील असे सांगितले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनबरोबरील आर्थिक संबंध पूर्णपणे तोडून टाकण्याचा पर्याय कायम असल्याचेही बजावले होते.

अमेरिकेने मोठी कारवाई केल्यास चीनकडून त्याला प्रत्युत्तर मिळू शकते. त्यात चीनमधील अमेरिकी कंपन्या व नागरिकांचाही समावेश असू शकतो. चीन सूडबुद्धीने कारवाई करू शकतो ही शक्यता ध्यानात घेऊन अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने चीनमधील अमेरिकी नागरिकांसाठी अलर्ट जारी केल्याचे दिसत आहे. या अलर्टमधून, अमेरिकेचा चीनच्या राजवटीवर विश्वास राहिलेला नाही, याची जाणीव ट्रम्प प्रशासन आपल्या नागरिकांना करून देत असल्याचे मानले जाते.

leave a reply