‘आयटूयुटू’द्वारे भारत आखाती क्षेत्रासाठी योगदान देईल

-संयुक्त राष्ट्रसंघात भारताची ग्वाही

संयुक्त राष्ट्रसंघ – “मध्यपूर्व अर्थात आखाती क्षेत्रातील शांती व समृद्धी यात भारताचेही हितसंबंध गुंतलेेले आहेत. त्यामुळे आखाती क्षेत्रासह दक्षिण आशियाईची ऊर्जासुरक्षा, अन्नसुरक्षा आणि आर्थिक विकास यासाठी भारत नव्याने स्थापन झालेल्या ‘आयटूयुटू’मार्फत योगदान देईल”, अशी ग्वाही भारताने दिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघात बोलताना भारताचे राजनैतिक अधिकारी आर. रविंद्र यांनी भारत, इस्रायल, अमेरिका व युएई यांच्या या आयटूयुटू गटाचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचवेळी इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर भारताला चिंता वाटत असल्याचे आर. रविंद्र यांनी स्पष्ट केले.

iTuTutu‘क्वेश्चन ऑफ पॅलेस्टाईन’ या विषयावर संयुक्त राष्ट्रसंघात पार पडलेल्या खुल्या चर्चेत भारताचे राजनैतिक अधिकारी बोलत हेोते. यावेळी इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर आर. रविंद्र यांनी चिंता व्यक्त केली. हा हिंसाचार त्वरित थांबविण्यात यावा व इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये थेट चर्चा सुरू व्हावी, अशी मागणी रविंद्र यांनी केली. ‘ही चर्चा आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत पार पडावी. या चर्चेत पॅलेस्टाईनच्या जनतेची स्वतंत्र राज्याची आकांक्षा आणि इस्रायलच्या सुरक्षाविषयक चिंतांची यथोचित दखल घेतली जावी. वाटाघाटीतून हा प्रश्न सुटू शकतो’, असा विश्वास भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

इस्रायल व पॅलेस्टाईनमधील या चर्चेला भारताचा संपूर्ण पाठिंबा असेल, असे आर. रविंद्र पुढे म्हणाले. दरम्यान, आखाती क्षेत्रातील शांती व समृद्धी यामध्ये भारताचे फार मोठे हितसंबंध गुंतलेले आहेत, हे देखील यावेळी रविंद्र यांनी लक्षात आणून दिले. भारत-इस्रायल-अमेरिका-युएई यांच्या आयटूयुटू या नव्या गटाद्वारे आखाती क्षेत्रासह दक्षिण आशियाई क्षेत्राच्या ऊर्जा व अन्नसुरक्षेबरोबर या क्षेत्राच्या आर्थिक विकासासाठी भारत आपले योगदान देईल, असे रविंद्र यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 14 जुलै रोजी आयटूयुटूच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली व्हर्च्युअल चर्चा पार पडली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिश्चिततेचा प्रभाव व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे आव्हान खडे ठकलेले असताना, आयटूयुटू हा अतिशय वेगळा गट व्यवहार्य सहकार्याचे उत्तम मॉडेल ठरेल, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले हेोते. आयटूयुटू सहा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संयुक्तरित्या गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यामध्ये पाणी, ऊर्जा, परिवहन, अंतराळ, आरोग्य व अन्नसुरक्षेचा समावेश आहे, याची आठवण रविंद्र यांनी यावेळी करून दिली.

दरम्यान, आयटूयुटूमधील भारताचा समावेश गेमचेंजर ठरेल, असा विश्वास इस्रायलच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी व्यक्त केला होता. भारताच्या प्रभावामुळे आखाती देश इस्रायलशी अधिक चांगल्यारितीने सहकार्य प्रस्थापित करू शकतील, असे इस्रायलच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे म्हणणे होते. तर या गटातील भारताचा सामवेश देशाच्या प्रभावाचा विस्तार होत असल्याचे दाखवून देते. विशेषतः आखाती क्षेत्रात भारताचा प्रभाव आयटूयुटूतील सहभागामुळे अधिकच वाढेल, असा विश्वास भारतीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply