सायबरहल्ल्यांच्या माध्यमातून चीन ब्रिटनमधील पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करु शकतो

-सुरक्षाविषयक सूत्रांचा इशारा

China-Cyber-Securityलंडन – ब्रिटनमध्ये सत्ताधारी ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’त पंतप्रधान पदासाठी नव्या नेत्याची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत चीन सायबरहल्ल्यांच्या माध्यमातून हस्तक्षेप करु शकतो, असा इशारा ब्रिटनमधील सुरक्षाविषयक सूत्रांनी दिला. 2016 साली झालेल्या ‘ब्रेक्झिट’च्या निवडणुकीत रशियाने सायबरक्षेत्राच्या माध्यमातून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्याची पुनरावृत्ती चीन करु शकतो, असे सूत्रांनी बजावले आहे.

ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पदाचा राजीनामा दिला असून नव्या नेत्याची निवड होईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’त नव्या पंतप्रधानांच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम टप्प्यात परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस व रिषी सुनाक यांच्यात लढत होणार असल्याचे निश्चित झाली आहे.

prime-ministerial-electionनिवडप्रक्रियेत ‘ऑनलाईन व्होटिंग’चा वापर करण्यात येणार आहे. प्रचारासाठीही दोन्ही उमेदवारांनी इंटरनेटवर भर दिल्याचे दिसून येते. याकडे लक्ष वेधून ब्रिटनमधील सुरक्षाविषयक तज्ज्ञांनी चीन यात हस्तक्षेप करु शकतो, असे बजावले आहे. अंतिम फेरीतील दोन्ही नेत्यांनी चीनविरोधातील आपली भूमिका आक्रमक राहिल, असे संकेत दिले होते. मात्र रिषी सुनाक यांनी व्यापाराच्या मुद्यावर चीनशी चांगले संबंध ठेवण्याचे संकेत दिल आहेत. चीनच्या माध्यमांनी त्याची दखल घेतल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता चीन सुनाक यांच्या निवडीसाठी प्रयत्न करु शकतो, असे मानले जाते.

काही दिवसांपूर्वीच ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये अमेरिका व ब्रिटनच्या सुरक्षा तसेच गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली होती. या परिषदेत ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय-5’च्या प्रमुखांनी चीनच्या वाढत्या कारवायांचा उल्लेख केला होता. चीन विविध माध्यमांमधून ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात हेरगिरी करीत असून यासंदर्भातील प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे ‘एमआय-5’च्या प्रमुखांनी बजावले होते.

leave a reply