जिनपिंग यांची चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा निवड

बीजिंग – शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदावर आले आहेत. चीनवर एकछत्री अंमल असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या ‘नॅशनल पिपल्स काँग्रेस’ने जिनपिंग यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या तिसऱ्या सत्राची घोषणा केली. यामुळे जिनपिंग हे चीनमधले सर्वाधिक शक्तीशाली नेते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून त्यांना आव्हान देण्याची ताकद चीनमधल्या दुसऱ्या कुठल्याही नेत्याकडे नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग पुन्हा राष्ट्राध्यक्षपदावर आल्याने त्याचे जगभरात पडसाद उमटणार असल्याचे दिसू लागले आहे.

जिनपिंग यांची चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा निवडगेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली होती. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी पिपल्स लिबरेशन आर्मीचे सर्वाधिकार पुन्हा एकदा स्वत:कडे ठेवले होते. चीनवर सत्ता गाजविण्यासाठी आवश्यक असलेली दोन्ही मुख्य पदे स्वत:कडे ठेवल्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रेदेखील जिनपिंग यांच्याकडेच येतील, हे उघड होते. अपेक्षेनुसार शुक्रवारी चीनच्या नॅशनल पिपल्स काँग्रेसने जिनपिंग यांची एकमुखाने निवड झाल्याची घोषणा केली.

जिनपिंग यांच्या या निवडीची बातमी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर जगभरातील विश्लेषकांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. चीनमधील कम्युनिस्ट राजवटीचे कडवे विरोधक आणि अमेरिकेतील प्रसिद्ध विश्लेषक, लेखक गॉर्डन चँग यांनी जिनपिंग यांच्या निवडीवर तीव्र चिंता व्यक्त केली. कम्युनिस्ट पक्ष व चीनच्या लष्करावर पकड मिळविल्यानंतर राष्ट्राध्यक्षपदावरील जिनपिंग यांची निवड ही फक्त औपचारिकता होती. ती देखील शुक्रवारी पूर्ण झाली. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चीनला डोंगराच्या कडेवर नेऊन ठेवले होते, येत्या काळात ते चीनचा कडेलोट करतील, असा इशारा गॉर्डन चँग यांनी दिला.

तर शुक्रवारच्या मतदानात चीनच्या नॅशनल काँग्रेसमध्ये एकूण २९५२ मते नोंदविण्यात आली व यातील सर्व मते जिनपिंग यांच्या बाजूने होती, याकडे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत. यावरून जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षावर मिळविलेली घट्ट पकड लक्षात येत असल्याचे हे विश्लेषक सांगत आहेत. चीनमधील जनतेबरोबरच कम्युनिस्ट पक्षावरही जिनपिंग यांनी आपली पकड मजबूत केली असून आपल्या विरोधकांना जिनपिंग यांनी पद्धतशीरपणे बाजूला केल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.

गेल्या वर्षी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत जिनपिंग यांच्या अंगरक्षकांनी चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांना पकडून सदर बैठकीतून बाहेर केले होते. याचे व्हिडिओज्‌‍ व फोटोग्राफ्स जगभरात प्रसिद्ध झाले होते. जिंताओ यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना बाहेर नेल्याचे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने म्हटले होते. पण कोरोनाच्या काळात जिनपिंग यांनी आपल्या देशाची प्रतिमा जगभरात डावलल्यामुळे जिंताओ यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्याचा सूड म्हणून जिनपिंग यांनी जिंताओ यांना बैठकीतून बाहेर केल्याचा दावा काही विश्लेषकांनी केला होता. याशिवाय कम्युनिस्ट पक्षातील जिनपिंग यांच्या विरोधकांचा संशयास्पद मृत्यू झाला, याकडेही हे विश्लेषक लक्ष वेधत आहेत. अशाप्रकारे जिनपिंग यांनी गेल्याच वर्षी कम्युनिस्ट पक्षावर आपली पकड मजबूत केली, याची आठवण विश्लेषक करून देत आहेत.

दरम्यान, चीनच्या राष्ट्राध्यक्षपदावर सलग तिसऱ्यांदा पकड मिळविणारे जिनपिंग येत्या काळात आपले लष्करी इरादे पूर्ण करतील. यामध्ये तैवानवरील लष्करी हल्ल्याचा समावेश असेल, असा दावा केला जातो. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ने आपल्या वार्षिक अहवालात तैवानच्या सुरक्षेला चीनपासून असलेला हा इशारा प्रसिद्ध केला होता. २०२७ सालापर्यंत चीन तैवानवर हल्ल्याचा प्रयत्न करील, असे अमेरिकन यंत्रणा बजावत आहे.

हिंदी

 

leave a reply