भारताकडून चीनच्या विरोधात ‘मेगाफोन डिप्लोमसी’चा वापर

- चीनच्या सरकारी मुखपत्राचा आरोप

बीजिंग – भारताबरोबर केलेल्या द्विपक्षीय करारांचे चीनने उल्लंघन केले आणि यामुळेच एलएसीवर तणाव निर्माण झाला, या भारताच्या आरोपावर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. चीन द्विपक्षीय करारांचा आदर करीत असल्याचे या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तर चीनची सरकारी मुखपत्रे भारत ‘मेगाफोन डिप्लोमसी’, अर्थात राजनैतिक पातळीवर आरडाओरडा करून; चीनविरोधात जगाची सहानुभूती कमावत असल्याचा आरोप करीत आहेत.

भारताकडून चीनच्या विरोधात ‘मेगाफोन डिप्लोमसी’चा वापर - चीनच्या सरकारी मुखपत्राचा आरोपक्वाडच्या बैठकीसाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेले होते. या भेटीत त्यांची ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मरिस पेन यांची द्विपक्षीय चर्चा पार पडली. यावेळी भारत व चीनच्या एलएसीवरील तणावावर बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या तणावाला चीन जबाबदार असल्याचा ठपक ठेवला होता. भारताबरोबर सीमा नियोजनासंदर्भात केलेल्या करारांचे चीनने उल्लंघन केले. यामुळे एलएसीवर तणाव निर्माण झाल्याचा आरोप जयशंकर यांनी केला.

चीनसारखा मोठा देश द्विपक्षीय कराराची कदर न करता त्याचे धडधडीतपणे उल्लंघन करतो, ही फार मोठ्या चिंतेची बाब ठरते, असे जयशंकर यांनी या चर्चेत म्हटले होते. वेगळ्या शब्दात चीनबरोबरील द्विपक्षीय करार व चीनकडून केले जाणारे दावे, यावर विश्‍वास ठेवता येणार नाही, असा संदेश जयशंकर यांनी जगाला दिला आहे. चीनने विश्‍वसार्हता गमावल्याची बाब भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी वेगळ्या शब्दात मांडल्याचे उघड झाले आहे.

भारताकडून चीनच्या विरोधात ‘मेगाफोन डिप्लोमसी’चा वापर - चीनच्या सरकारी मुखपत्राचा आरोपआधीच क्वाडच्या बैठकीमुळे अस्वस्थ झालेल्या चीनने भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या विधानांची गंभीर दखल घेतली. चीन द्विपक्षीय करारांचा आदर व पालन करणारा देश असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी म्हटले आहे.

तसेच सीमेवर सलोखा व सौहार्द राखण्यासाठी चीन भारताबरोबर काम करीत असल्याचे सांगून उभय देश राजनैतिक तसेच लष्करी पातळीवर चर्चा करून हा तणाव कमी करतील, असा विश्‍वास वेनबिन यांनी व्यक्त केला.

मात्र चीनचे दुखणे खर्‍या अर्थाने या देशाच्या सरकारी वर्तमानपत्राने उघड केले आहे. भारत चीनच्या विरोधात मेगाफोन डिप्लोमसीचा वापर करीत असल्याचा ठपका चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ या दैनिकाने ठेवला. भारताने सीमाभागात सुरू केलेले बांधकाम हाच चीनबरोबरील वादाचा प्रमुख मुद्दा आहे, असे या दैनिकाने म्हटले आहे. असे असूनही चीनने गलवान खोर्‍याती संघर्षानंतर संयमी भूमिका स्वीकारली. दोन्ही देशांनी हा वाद सामोपचाराने सोडविण्याचे मान्य केले. यानंतरही भारत चीनच्या विरोधात राजनैतिक स्तरावर आरडाओरडा करून आंतरराष्ट्रीय पातळीवर सहानुभूती कमावण्याचा प्रयत्न करीत आहे, असा ठपका ग्लोबल टाईम्सने ठेवला.

leave a reply