युक्रेनची रशियाबरोबर चर्चेची तयारी

किव्ह – रशियाने युक्रेन सीमेवर केलेल्या लष्करी जमवाजमवीच्या पार्श्‍वभूमीवर रशियाबरोबर चर्चा करण्याची तयारी युक्रेन सरकारने दर्शविली आहे. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ही माहिती दिली. या पार्श्‍वभूमीवर जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ सोमवारी युक्रेनमध्ये दाखल झाल्याचे समोर आले आहे.

युक्रेनची रशियाबरोबर चर्चेची तयारीअमेरिकेसह युरोपिय देशांनी गेल्या काही दिवसात रशियाच्या आक्रमणाबाबत सातत्याने इशारे देण्यास सुरुवात केली आहे. पाश्‍चात्यांकडून सुरू असलेल्या वक्तव्यांवर युक्रेन सरकारने नाराजी व्यक्त केली असून अशा वक्तव्यांमुळ घबराटीचे वातावरण निर्माण होत असल्याचे म्हटले आहे. या घबराटीमुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते.

अशा स्थितीत युक्रेनने रशियाबरोबर चर्चेची तयारी दर्शविणे लक्ष वेधून घेणारे ठरते. यापूर्वी रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये झालेल्या सर्व चर्चा अपयशी ठरल्या आहेत. याची कल्पना असतानाही युक्रेनने रशियाबरोबर चर्चेसाठी पुढे येणे महत्त्वाचे ठरते. रशिया, युक्रेन व युरोपिय देशांचा समावेश असलेल्या ‘मिन्स्क ग्रुप’च्या माध्यमातून ही चर्चा होईल, असे संकेत देण्यात आले आहेत. चर्चेदरम्यान रशियाला सीमेवरील लष्करी तैनातीबाबत विचारणा करण्यात येईल, असे युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी सांगितले.

युक्रेनची रशियाबरोबर चर्चेची तयारीदरम्यान, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ सोमवारी युक्रेन दौर्‍यावर दाखल झाले आहेत. राजधानी किव्हमध्ये त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी, रशिया युक्रेबरोबरील तणाव कमी करण्यासाठी गंभीर प्रयत्न करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचवेळी जर्मनी व इतर पाश्‍चात्य देश युरोपच्या सुरक्षेच्या मुद्यावर रशियाशी वाटाघाटी करण्यास तयार असल्याची ग्वाहीदेखील जर्मन चॅन्सेलरनी दिली.

युक्रेनचे ब्रिटनमधील राजदूत वादिम प्रिस्टेको यांनी, सध्याचा तणाव टाळण्यासाठी युक्रेन नाटोत सामील न होण्याच्या शक्यतेवर विचार करु शकतो, असे विधान करून खळबळ उडवली आहे. ब्रिटीश वृत्तवाहिनी बीबीसीच्या ‘रेडिओ ५’ ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्यावर युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले असून राजदूतांचे वक्तव्य घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.

leave a reply