अमेरिकेसह युरोप व लॅटिन अमेरिकेत आर्मेनियाच्या समर्थनार्थ निदर्शने

लॉस एंजेलिस – गेले दोन आठवडे मध्य आशियात सुरू असणाऱ्या आर्मेनिया-अझरबैजान युद्धाचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटताना दिसत आहेत. रविवारी अमेरिकेत तब्बल एक लाख नागरिकांनी तुर्की तसेच अझरबैजानच्या दूतावासासमोर तीव्र निदर्शने केली. गेल्या काही दिवसात अमेरिकेव्यतिरिक्त युरोप तसेच लॅटिन अमेरिकी देशांमध्येही आर्मेनियाच्या समर्थनार्थ निदर्शने झाल्याचे समोर आले आहे.

समर्थनार्थ निदर्शने

२७ सप्टेंबरपासून मध्य आशियातील आर्मेनिया व अझरबैजानमध्ये जोरदार युद्ध भडकले आहे. या युद्धात हजारो जणांचा बळी गेला असून त्यात रोज भर पडत आहे. युद्धात ‘नागोर्नो-कॅराबख’ प्रांतातील ७० हजारांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत. त्यात आर्मेनियन्स बहुसंख्येने असून त्यांनी सध्या आर्मेनियतील शहरांचा आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. या विस्थापित नागरिकांच्या सहाय्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ वाहू लागला आहे. अमेरिका व युरोपमधील आर्मेनियन वंशाचे अनेक नागरिक मदतीसाठी आर्मेनियात दाखल झाले आहेत. त्याचवेळी जगभरातील विविध देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या आर्मेनियन नागरिकांच्या संघटनाही सक्रिय झाल्या आहेत.

गेल्या आठवड्यापासून अमेरिकेसह युरोपिय देश व लॅटिन अमेरिकेत हजारो आर्मेनियनवंशीय रस्त्यावर उतरून तुर्की व अझरबैजानविरोधात नाराजी व्यक्त करीत आहेत. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये रविवारी झालेली निदर्शने आतापर्यंत झालेली सर्वात मोठी निदर्शने ठरली आहेत. यावेळी निदर्शकांनी शहरातील महत्त्वाचे मार्ग रोखून धरले होते. अमेरिकेने आर्मेनिया-अझरबैजान संघर्षात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही निदर्शकांनी केली. अमेरिकेतील आर्मेनियन वंशीय नागरिकांनी आर्मेनियाच्या सहाय्यासाठी निधीं जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत सुमारे पाच लाख आर्मेनियन वंशाचे नागरीक वास्तव्यास असल्याचे मानले जाते.

समर्थनार्थ निदर्शने

अमेरिकेव्यतिरिक्त युरोपातील ब्रिटन, फ्रान्स व इटलीमध्येही आर्मेनियन वंशाच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. लॅटिन अमेरिकेतील ब्राझील तसेच अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्येही निदर्शने झाल्याचे सांगण्यात येते. कॅनडा, लेबेनॉन या देशांमध्येही आर्मेनियन वंशाच्या नागरिकांनी मोर्चे काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व निदर्शनांमध्ये तुर्कीचा तीव्र निषेध करण्यात आला असून ही राजवट पुन्हा वंशसंहार घडवीत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

जगभरात सध्या आर्मेनियन वंशाच्या नागरिकांची संख्या एक कोटीहून अधिक असून, त्यातील सुमारे ३० लाख आर्मेनियन्स हे आर्मेनिया देशाचे नागरिक आहेत. तर ७० लाखांहून अधिक आर्मेनियन्स जगभरातील ८५ हून अधिक देशांमध्ये वास्तव्यास आहेत. पहिल्या महायुद्धात तत्कालीन तुर्कीतील ऑटोमन साम्राज्याने केलेल्या वंशसंहारामुळे आर्मेनियन वंशियाना जगातील इतर देशांचा आश्रय घेणे भाग पडले होते.

leave a reply