भारत मानवकेंद्री जागतिकीकरणाचा पुरस्कार करील

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

मानवकेंद्री जागतिकीकरणनवी दिल्ली – अभाव व संघर्ष निर्माण करणारी आधीच्या काळातील आत्मकेंद्री व्यवस्था मागे टाकून अध्यात्मावर आधारलेली एकजुटीची भावना प्रस्थापित करायला हवी. याद्वारे आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हानांवर अधिक समर्थपणे मात करता येईल, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. गुरूवारपासून जी२०चे अध्यक्षपद भारताकडे आले असून या निमित्ताने पंतप्रधानांनी जी२०च्या सदस्यदेशांसह जगाला ‘वसुधैव कुटुंबक्‌‍‍म’चा संदेश दिला. केवळ जी२०चे सदस्यदेशच नाही तर ग्लोबल साऊथमध्ये येणाऱ्या आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशांनाही सामावून घेण्यासाठी भारत जी२०चा वापर करील, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

जागतिकीकरणामागील संकल्पना बदलण्याची आवश्यकता यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केली. अभाव व संघर्ष पेटविणाऱ्या आत्मकेंद्री जागतिकीकरणाच्या प्रक्रियेऐवजी, मानवकेंद्री जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला वेग देणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. भारत आपल्या जी२०च्या अध्यक्षपदाचा वापर मानवकेंद्री जागतिकीकरणासाठी करील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. तर भारताकडे आलेले जी२०चे हे अध्यक्षपद म्हणजे सर्वसाधारण राजनैतिक बाब ठरत नाही. तर कोरोनाची साथ व युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत हे अध्यक्षपद भारताकडे येत आहे. त्याचवेळी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहे, ही फार मोठी घटना ठरते. अशा परिस्थितीत भारताचे हे अध्यक्षपद सर्वसमावेशक व महत्त्वाकांक्षी ठरेल. भारत सर्वांच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न करील, असा विश्वास परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेल्या या विधानाचा दाखला देऊन पाश्चिमात्य माध्यमांनी भारताने पुन्हा एकदा युक्रेनचे युद्ध पुकारणाऱ्या रशियाविरोधात भूमिका घेतल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमांनी केले आहेत.

जी२० परिषदेत रशियाने सहभाग घ्यावा, असे आवाहन भारताकडून करण्यात येत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी रशियाने या परिषदेत पूर्णपणे सहभागी व्हावे व प्रत्येक सत्रात रशियाचा सहभाग भारताला अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. आधीच्या काळात पार पडलेल्या जी२०मध्ये रशियाला वगळण्याची मागणी झाली होती. युक्रेनच्या युद्धामुळे तसा निर्णय घेण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचा दावा काही देशांनी केला होता. मात्र पाश्चिमात्यांनी कितीही दावे केले तरी भारताच्या रशियाबरोबरील संबंधांवर याचा परिणाम होणार नाही, हे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दाखवून दिले आहे. जी२०मध्ये भारताला रशियाचा संपूर्ण सहभाग अपेक्षित आहे, हे स्पष्ट करून दोन्ही देशांच्या संबंधांवर कुठलाही परिणाम झालेला नाही, असा संदेशच भारताकडून दिला जात आहे.

leave a reply