भारत व अमेरिकेच्या युद्धसरावावर आक्षेप घेणाऱ्या चीनला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फटकारले

युद्धसरावावर आक्षेपनवी दिल्ली – उत्तराखंडमध्ये सुरू असेलल्या भारत व अमेरिकन लष्करामधील युद्धसरावावर आक्षेप घेणाऱ्या चीनला भारताने चांगलेच खडसावले आहे. भारताच्या दुसऱ्या देशाबरोबरील युद्धसरावावर नकाराधिकार वापरण्याचा हक्का तिसऱ्या देशाला नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. भारत-अमेरिकेच्या या युद्धसरावामुळे भारताने चीनबरोबर केलेल्या १९९३ व १९९६ सालच्या सीमाकरारांचे उल्लंघन होत असल्याचा चीनचा दावा बागची यांनी धुडकावला आहे. भारत व अमेरिकेच्या युद्धसरवाचा या सीमाकरारांशी काहीही संबध नाही, असा निर्वाळा बागची यांनी दिला. मात्र या करारांचा दाखला देणाऱ्या चीननेच आपल्या कारवायांद्वारे सदर करारांचे उल्लंघन होत आहे, याकडे लक्ष द्यावे, असा टोला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी लगावला आहे.

चीनबरोबरील एलएसीपासून सुमारे १०० किलोमीटर इतक्या अंतरावर भारत व अमेरिकेचा ‘युद्ध अभ्यास’ सुरू आहे. या युद्धसरावावर चीनने आक्षेप नोंदविला होता. भारताने ९३ व ९६ साली चीनबरोबरील सीमेवर शांतता आणि सौहार्द प्रस्तापित करण्यासाठी सीमाकरार केले होते. अमेरिकेबरोबर युद्धसराव करून भारत या करारांचे उल्लंघन करीत असल्याची टीका चीनने केली होती. तसेच अमेरिकेने भारत व चीनमधील सीमावादापासून दूर रहावे, असा इशाराही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी दिला होता. यावर भारताची प्रतिक्रिया आली असून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यावरून चीनला चांगलेच फटकारले.

भारत दुसऱ्या देशाबरोबर करीत असलेल्या युद्धसरावावर नकाराधिकार वापरण्याचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा हक्क तिसऱ्या देशाला असू शकत नाही. भारताने हा अधिकार कुणालाही दिलेला नाही, असे अरिंदब बागची यांनी चीनला खडसावले. तसेच भारत व अमेरिका करीत असलेल्या युद्धसरावाचा ९३ व ९६ सालच्या सीमाकराराशी काहीही संबंध नाही, असे बागची यांनी स्पष्ट केले. एलएसीवरील आपल्या कारवायांद्वारे चीन सातत्याने भारताबरोबरील या करारांचे उल्लंघन करीत आला आहे, याची आठवण यावेळी बागची यांनी चीनला करून दिली. चीनला आपल्या या कारवायांवर फेरविचार करण्याची गरज असल्याचा टोला अरिंदम बागची यांनी लगावला.

याआधी पाकिस्तानव्याप्त काश्मीर तसेच एलएसीवर चीनने भारताच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कारवाया सुरू ठेवल्या होत्या. त्यावरील भारताच्या आक्षेपाकडे चीनने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. थेट उल्लेख केलेला नसला तरी चीनच्या या कारवायांची आठवण भारताचे परराष्ट्र मंत्रालय करून देत आहे. अशा स्थितीत भारताच्या अमेरिकेबरोबरील युद्धसरावावर आक्षेप नोंदविण्याचा अधिकार चीनला असूच शकत नाही, याची जाणीवही भारताकडून करून दिली जात आहे. दरम्यान, चीनमध्ये कोरोनाच्या फैलावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पत्रकारांनी बागची यांना प्रश्न केले होते. मात्र दुसरा देश कोरोनाची साथ कशारितीने हाताळत आहे, यावर आपल्याला बोलायचे नाही, असे सांगून बागची यांनी यावर बोलण्याचे टाळले.

सध्या चीनमध्ये कोरोना फैलावू नये, यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवर तिथल्या जनतेची तीव्र प्रतिक्रिय उमटत आहे. चीनच्या राजवटीला याचा फटका बसला असून कित्येक वर्षात पहिल्यांदाच चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात जनता रस्त्यावर उतरल्याचे या निमित्तान पहायला मिळत आहे. मात्र चीनमधील या परिस्थितीवर बोलण्यासाठी उत्सुक नसल्याचे सांगून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी चीनला ‘समज’ दिली आहे.

भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर, चीनच्या सरकारी माध्यमांनी भारताच्या नद्यांमध्ये प्रेते वाहत असल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. याच काळात चीनने एका रॉकेटचे प्रक्षेपण केले, तर भारतात मात्र प्रेतांच्या चिता पेटलेल्या दिसत आहे, असे दाखविणारे फोटोग्राफ्स दाखवून चीनच्या माध्यमांनी भारताची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला होता. याचे उट्टे काढण्यासाठी भारत चीनमधल्या सध्याच्या स्थितीचा लाभ घेऊ शकतो, पण आपला देश तसे करणार नाही, याची जाणीव परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी करून दिली आहे.

leave a reply