भारतीय सैन्याशी मुकाबला करणार्‍यांची शकले होतील

- संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली – ‘भारतीय सैनिकांचे मनोबल अत्युच्च कोटीचे असून जो कुणी भारतीय सैन्याचा मुकाबला करण्यासाठी पुढे येईल, त्याची शकले होऊन तो बरबाद झाल्याखेरीज राहणार नाही’, असे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे. अरुणाचल प्रदेश व आसाममधील चीनला भिडलेल्या एलएसीवर तैनात असलेल्या लष्कराच्या चौक्यांना जनरल रावत यांनी भेट दिली. इथल्या सुरक्षेचा आढावा घेऊन जनरल रावत यांनी सैनिकांशी थेट संवाद साधला. त्यानंतर चीनला इशारा देणारे उद्गार संरक्षणदलप्रमुखांनी काढले आहेत.

शकले

लडाखच्या एलएसीवर भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर खडे ठाकले आहे. चीनच्या तोडीस तोड तैनाती करून भारताने चीनला सडेतोड प्रत्युत्तर दिले. आता प्रचारयुद्धाचा आसरा घेऊन चीन आपण भारतावर कुरघोडी केल्याचे चित्र उभे करीत आहे. मात्र लडाखच्या एलएसीवर भारत चीनपेक्षा खूपच भक्कम स्थितीत असल्याचा निर्वाळा तटस्थ सामरिक विश्‍लेषक देत आहेत. अशा परिस्थितीत चीन एलएसीच्या इतर भागांपासून ते हिंदी महासागर क्षेत्रापर्यंत भारतासमोर नवे आव्हान उभे करण्याची तयारी करीत असल्याच्या बातम्या येत आहेत.

एका दिवसापूर्वी चीनने तिबेटच्या सीमेपर्यंत रेल्वे लाईन सक्रीय केल्याच्या बातम्या आल्या होत्या. हे ठिकाण अरुणाचल प्रदेशच्या एलएसीनजिक आहे. चीनने अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेट असल्याचा दावा करून त्यावर आपला अधिकार असल्याचे म्हटले होते. भारताने वेळोवेळी चीनचा हा दावा धुडकावला असला तरी इथल्या एलएसीवरील चीनच्या कारवाया भारताच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या ठरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, तिबेटच्या सीमेपर्यंत आलेल्या चीनच्या रेल्वेमार्गाचे महत्त्व वाढले आहे. त्याची दखल घेऊन संरक्षणदलप्रमुखांनी अरुणाचल प्रदेश व आसाममधील एलएसीला भेट दिल्याचे दिसते.

या भेटीत संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी भारतीय सैनिकांचे मनोबल उच्च कोटीचे असून त्यांच्याशी टक्कर घेण्याची क्षमता चीनकडे नाही, असे वेगळ्या शब्दात स्पष्ट केले. जो कुणी भारतीय सैन्याचा मुकाबला करण्यासाठी पुढे येईल, त्याची शकले होऊन ते बरबाद झाल्याखेरीज राहणार नाहीत, अशा शब्दात जनरल रावत यांनी सैनिकांच्या धैर्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

तसेच इथल्या वातावरणात केवळ भारतीय सैनिकच आपले कर्तव्य पार पाडू शकतात. भारतीय सैनिकांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून व त्यांच्या निर्धारापासून कुणीही दूर करू शकत नाही, असे जनरल रावत पुढे म्हणाले. याबरोबरच गस्त आणि टेहळणीसाठी भारतीय सैनिकांकडून दाखविल्या जाणार्‍या कल्पकतेलाही जनरल रावत यांनी दाद दिली.

काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी लडाखच्या एलएसीचा दौरा केला होता. यावेळी चीनच्या लष्कराच्या अगदी समीप असलेल्या भारतीय लष्कराच्या रेचिन ला येथील चौकीवर जनरल नरवणे पोहोचले होते. याद्वारे भारतीय लष्कराकडून चीनला परखड संदेश दिला जात असल्याचे दिसते. वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी चीनला कडक शब्दात समज दिली होती. लडाखच्या एलएसीवरील तणाव चीनच्या भल्याचा नाही, यामुळे चीनची फार मोठी हानी होईल, असे वायुसेनाप्रमुख म्हणाले होते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही चीनला सरळ शब्दात खडसावले होते. ‘भारत आपल्या एक इंच भूमीवरही इतरांना ताबा मिळू देणार नाही. बळाचा वापर करून एलएसीवरील स्थिती बदलता येणार नाही’, असे राजनाथ सिंग म्हणाले होते. वायुसेनेच्या एका कार्यक्रमात बोलतानाही संरक्षणमंत्र्यांनी भारत कुठल्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याची जाणीव चीनला करून दिली होती.

leave a reply