गलवान व्हॅलीतील संघर्षावरून चीनवर टीकास्त्र सोडणार्‍या ठरावाला अमेरिकी संसदेची मंजुरी

वॉशिंग्टन/नवी दिल्ली – अमेरिकेच्या संसदेत मंजूर झालेल्या नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन अ‍ॅक्ट’मध्ये (एनडीएए) भारताच्या गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षावरून चीनला धारेवर धरण्यात आले आहे. हा संघर्ष चीनच्या युद्धखोरीमुळे भडकल्याचे सांगून याची संपूर्ण जबाबदारी चीनचीच असल्याचा दावा या ठरावात करण्यात आला आहे. हा ठराव अमेरिकेच्या ‘एनडीएए’चा भाग बनला असून ‘एनडीएए’चे आता कायद्यात रुपांतर झाले आहे.

चीनवर टीकास्त्र

गलवान व्हॅलीमध्ये चीनच्या लष्कराने आकस्मिक हल्ला चढवून भारताच्या २० सैनिकांना शहीद केले होते. कर्नल संतोष बाबू यांच्यासह या संघर्षात २० सैनिक शहीद झाल्यानंतर भारतात चीनच्या विरोधात संतापाची तीव्र लाट आली होती. या संघर्षात चीनचे जवान भारतीय सैनिकांपेक्षाही अधिक संख्येने ठार झाल्याचे वृत्त आहे. पण चीनने ही संख्या उघड करण्याचे नाकारले. तसेच हा संघर्ष भारतीय लष्कराच्या आक्रमकतेमुळे उद्भवला, असा आरोप चीनने केला होता. पण आंतरराष्ट्रीय जनमत भारताच्या बाजूने उभे राहिले असून या प्रकरणी अमेरिकेनेही भारताची बाजू उचलून धरल्याचे दिसत आहे.

चीन भारतालगतच्या सीमेवर सातत्याने आक्रमकतेचे प्रदर्शन करीत आहे, असा ठपका अमेरिकन संसदेत मांडण्यात आलेल्या ‘एनडीएए’मध्ये ठेवण्यात आला होता. दोन्ही देशांच्या सीमेवरील परिस्थिती सामान्य पातळीवर आणण्यासाठी आता चीननेच पुढाकार घ्यायला हवा. इथली परिस्थिती बळाचा वापर करून बदलण्याचा प्रयत्न चीनने करता कामा नये, असे शेरे ‘एनडीएए’मध्ये मारण्यात आले आहेत.

तसेच भूतानसारख्या छोट्या देशाच्या भूभागावर चीनने ठोकलेले दावे आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग करणारे आहेत. यामुळे क्षेत्रात अस्थैर्य माजत असल्याची टीकाही ‘एनडीएए’मध्ये करण्यात आली आहे.

साऊथ चायना सी व ईस्ट चायना सी क्षेत्रातील चीनच्या कुरापतखोर कारवायांचाही उल्लेख यात करण्यात आला आहे. अमेरिकेचे काँग्रेसमन राजा कृष्णमुर्ती यांनी चीनवर टीका करणारा ठराव संसदेत प्रस्तावित केला होता. याला अमेरिकेच्या संसदेत मिळालेली मान्यता भारतासारख्या महत्त्वाच्या साथीदार देशाच्या मागे अमेरिका ठामपणे उभी आहे, हे सिद्ध करीत आहे. भारतासह आपल्या इतर भागीदार देशांबाबत अमेरिकेची बांधिलकी यामुळे अधिक प्रकर्षाने समोर येईल, असा विश्‍वास कृष्णमुर्ती यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भारत आणि चीनमधील वादात अमेरिकेने भारताची बाजू घेऊन लडाखच्या एलएसीवरील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थीचा प्रस्तावही दिला होता. भारताने हा प्रस्ताव नाकारला होता. पण चीनने गलवान व्हॅलीत भ्याड हल्ला चढवून भारताचा पुन्हा एकदा विश्‍वासघात केला. याचे दीर्घकालीन परिणाम चीनला भोगावे लागतील, असे भारताकडून सातत्याने बजावले जात आहे. भारताचे चीनबरोबरील व्यापारी सहकार्य यामुळे धोक्यात आलेले आहे. पुढच्या काळात चीन भारताच्या बाजारपेठेचा लाभ उचलू शकणार नाही, असा संदेश चीनला भारताकडून दिला जात आहे.

leave a reply