चीन व अमेरिकेमधील संबंध निर्णायक टप्प्यावर

- परराष्ट्रमंत्री वँग यी

निर्णायक टप्प्यावर

बीजिंग/वॉशिंग्टन – ‘गेली काही वर्षे चीन व अमेरिकेतील संबंधांसाठी अभूतपूर्व अडचणींचा काळ ठरला असून आता दोन्ही देशांमधील संबंध निर्णायक टप्प्यावर आहेत. समोर आशेची नवी खिडकी दिसत असून संबंध सुधारण्यासाठी ही संधी ठरु शकते’, असा दावा चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात शीतयुद्धकालिन धोरण राबविल्याचा आरोपही परराष्ट्रमंत्री यी यांनी यावेळी केला. चीनचे परराष्ट्रमंत्री संमिश्र संकेत देत असतानाच, अमेरिकेतील आघाडीच्या ‘न्यूयॉर्क स्टॉक एक्सेंज’ने तीन बड्या चिनी कंपन्यांची हकालपट्टी केल्याचे वृत्त समोर आले आहे.

अमेरिकेत गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीनंतर ज्यो बायडेन यांची नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली असून, येत्या काही दिवसात ते पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. बायडेन व डेमोक्रॅटिक पक्षाची चीनबाबतची भूमिका विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा सौम्य असेल, असे दावे करण्यात येत आहेत. चीनमधील काही नेते व विश्‍लेषकांनीही त्याला दुजोरा दिला असून, चीनकडून अमेरिकेबरोबरील संबंध पूर्ववत करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. परराष्ट्रमंत्री यी यांचे वक्तव्य त्याचाच भाग मानला जातो.

निर्णायक टप्प्यावर

‘अमेरिकेने चीनला दडपण्याचे व नवे शीतयुद्ध सुरू करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे दोन्ही बाजूंचे संबंध दुखावण्याबरोबरच जगातही मोठ्या उलथापालथी झाल्या. अशा धोरणाचे कोणीही समर्थन करणार नसून ते अपयशीच ठरेल’, असा ठपका चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला. मात्र त्याचवेळी चीन अमेरिकेबरोबर संबंध विकसित करण्यास तयार असल्याचे संकेतही यी यांनी दिले. समन्वय, सहकार्य व स्थैर्य यावर आधारित संबंध जोडण्यास चीन उत्सुक आहे, असा दावा त्यांनी केला.

चीनच्या विकासामुळे अमेरिकेतील काहीजण अस्वस्थ असल्याची चीनला जाणीव असल्याचेही परराष्ट्रमंत्री यी म्हणाले. अमेरिकेने भूतकाळातून धडे घेऊन चीनबरोबर एकाच दिशेने पावले उचलली तर दोन्ही देशांमध्ये मतभेद मिटविण्याची क्षमता आहे, असा सल्लाही यी यांनी यावेळी दिला. त्याचवेळी अमेरिकेने चीनने स्वीकारलेली सामाजिक व्यवस्था आणि विकासाचा मार्ग यांचा आदर करावा, अशी मागणीही चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी केली.

निर्णायक टप्प्यावर

चीनचे परराष्ट्रमंत्री अमेरिकेला सल्ले देत असतानाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनविरोधातील कारवाईची धार कायम ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने चीनच्या लष्कराशी संबंधित असलेल्या ३१ कंपन्यांची यादी जाहीर करून त्यांच्याविरोधात कडक कारवाईचे संकेत दिले होते. अमेरिकेतील आघाडीचा शेअरबाजार असणार्‍या ‘न्यूयॉर्क स्टॉक एक्सेंज’ने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

‘चायना मोबाईल कम्युनिकेशन्स’, ‘चायना टेलिकम्युनिकेशन्स कॉर्प’ व ‘चायना युनिकॉर्न(हाँगकाँग) या तीन कंपन्यांची न्यूयॉर्क शेअरबाजारातून हकालपट्टी करण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्याच्या अखेरीपर्यंत ही प्रक्रिया पार पडलेली असेल, अशी माहिती ‘न्यूयॉर्क स्टॉक एक्सेंज’कडून देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘हुवेई’ व ‘झेडटीई’ या आघाडीच्या चिनी कंपन्यांवरही बंदीची घोषणा केली होती. त्यानंतर अमेरिकेत कार्यरत असणार्‍या चीनच्या जवळपास ५० हून अधिक कंपन्यांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

leave a reply