जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या पावणेचार लाखांवर

ब्रुसेल्स – कोरोनाव्हायरसमुळे गेल्या चोवीस तासात जगभरात ३२०० जण दगावले आहेत. तर याच काळात जगभरात १,०९,००० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या साथीच्या जगभरातील एकूण रुग्णांपैकी २८ लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, या साथीच्या काळात अमेरिकेने रशियाला व्हेन्टिलेटर्सचा दुसरा साठा पाठविला असून ब्राझीललाही वैद्यकीय सहाय्य पुरविले आहे.

coronavirus victims death worldwideजगभरातील २१२ देशांमध्ये कोरोनाव्हायरसने दगावणाऱ्यांची एकूण संख्या ३,७४,७१७ वर पोहोचली आहे. अमेरिकेत या साथीचे सर्वाधिक १,०६,१९५ बळी गेले असून गेल्या चोवीस तासात दगावणार्‍या ६३८ जणांचा यात समावेश आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये या साथीच्या बळींची आणि रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असलेल्या ब्राझीलमध्ये  आत्तापर्यंत २९,३१४ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये गेल्या चोवीस तासात मृत्यू झालेल्या ४८० जणांचा समावेश आहे.

coronavirus victims worldwideजगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ६३ लाखांच्याही पुढे गेली असून सलग पाचव्या दिवशी  एक लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये अमेरिकेतील १९ हजार नव्या रुग्णांचा समावेश आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या १८,४१,३७५ लाख एवढी असून यापैकी सहा लाखाहून अधिक रुग्ण या साथीतून बरे झाले आहेत. तर अमेरिकेपाठोपाठ या साथीचे सर्वाधिक, पाच लाख रुग्ण ब्राझीलमध्ये असून गेल्या चोवीस तासात या देशात १६,४९० रुग्णांची यात भर पडली आहे. गेल्या चोवीस तासात रशिया, भारत यांच्याबरोबरच इराणमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही वाढ झाल्याचे उघड झाले आहे. दोन महिन्यात पहिल्यांदाच आपल्या देशात तीन हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्याचे इराणने मान्य केले आहे.

दरम्यान, व्हेंटिलेटरचा दुसरा साठा घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान रविवारी रशियन राजधानी मॉस्कोमध्ये उतरले. याआधी २१ मे रोजी अमेरिकेने रशियाला ५० व्हेन्टिलेटर्स पुरविले होते. तर रविवारी दीडशे व्हेन्टिलेटर्स रशियामध्ये दाखल झाले. रशियाबरोबरच अमेरिकेने ब्राझीललाही वैद्यकीय सहाय्य पुरविले आहे. कोरोनाच्या रुग्णांना देण्यात येणारे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन गोळ्यांचा मोठा साठा अमेरिकेने ब्राझीलसाठी रवाना केला आहे.

leave a reply