चीनच्या हालचालींमुळे लडाखमध्ये भारतीय लष्कर अलर्टवर

नवी दिल्ली – लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीचा डाव भारताने हाणून पडला होता. भारत आणि चीनच्या सैनिकांनामध्ये झालेला वाद मिटविण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या खऱ्या मात्र येथला तणाव संपलेला नाही. या भागात लष्कर हाय अलर्टवर आहे. कारण गलवान नदीजवळ आणि डेमचोक भागानजीक चीनच्या हालचाली वाढल्याच्या बातम्या आहेत. गलवान नदीच्या किनारी भागात चीनने तंबू ठोकल्याचे, तर डेमचोकमध्ये चीनकडून बांधकामे सुरु असल्याचे दावे काही बातम्यांमध्ये करण्यात आले आहेत.

५ मे रोजी पँगोंग सरोवराच्या क्षेत्रात चीनने घसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय सैनिकांनी त्यांना येथून मागे हटण्यास भाग पडले होते. तर त्याआधी चीनच्या हेलिकॉप्टर्सनी सीमा रेषेजवळ घिरट्या घातल्या होत्या. त्याचवेळी भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी सीमेवर गस्त घालून चीनला योग्य तो संदेश दिला होता. प्रॉटोकॉलनुसार चर्चा करून हा वाद मिटविण्यात आला असला तरी या भागात तणाव आहे. विशेषतः चीनच्या भागात काही लष्करी हालचाली दिसून आल्यानंतर भारतीय सैनिक अलर्टवर आहेत.

चीनने गलवान नदी किनारी भागात तंबू ठोकले आहेत. याच किनारी क्षेत्रातुन १९६२ साली चीनचे आक्रमण केले होते. त्यामुळे चीनच्या येथील हालचालींवर भारतीय सुरक्षादल बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच डेमचोकमच्या क्षेत्रातही चीनच्या हालचाली दिसल्या आहेत. येथे सुमारे हजार अवजड वाहने दिसून आली असून येथे चीन बांधकामे करीत असल्याचा गोपनिय अहवाल आहे.

डेमचोक आणि येथून जवळ असलेल्या दौलत बेग ओल्डीमध्ये या आधीही भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापटी झाल्या होत्या. २०१३ साली दौलत बेग ओल्डीमध्ये भारतीय सीमेत आत घुसून तंबू ठोकले होते. तीन आठवडे येथे भारतीय सैनिक आणि चिनी जवान एकमेकांसमोर खडे ठाकले होते. त्याआधी २०११ साली चिनी जवानांनी भारतीय सीमेत याच भागात घुसखोरी केली होती. २०१६ साली डेमचोकमध्ये दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भिडले होते.

मात्र सध्या डेमचोकजवळ चीनच्या हालचाली पाहता येथे चीन धावपट्टी उभारत असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वादग्रस्त सीमा क्षेत्राच्या इतक्या जवळ बांधकामे हे दोन्ही देशांमधील कराराचे उल्लंघन ठरते. त्यामुळे येथील हालचालींवर भारत बारकाईने नजर ठेवून असल्याच्या बातम्या आहेत. पण भारतीय सरकार किंवा लष्कराने अधिकृत पातळीवर याबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

leave a reply