सिरियात सुरू असलेला संघर्ष चिंताजनक आणि धोकादायक

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या राजदूतांचा इशारा

चिंताजनक आणि धोकादायकन्यूयॉर्क/मॉस्को/तेहरान – ‘तीन वर्षांपासून सिरियामध्ये शांतता प्रस्थापित झाली होती. पुढच्या काळात राजकीय सुधारणांनी सिरियातील लष्करी कारवाया कमी करता आल्या असत्या. पण गेल्या काही महिन्यांपासून सिरियामधील लष्करी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली असून ही अतिशय चिंताजनक आणि धोकादायक बाब ठरते’, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने सिरियासाठी नियुक्त केलेले विशेषदूत गेर पेडरसन यांनी दिला.

सिरियात लष्कर घुसवून कारवाई करण्याची धमकी तुर्कीने दिलेली आहे. तुर्कीच्या हल्ल्यापासून सिरियातील कुर्दांचे रक्षण करण्यासाठी रशियाने आपल्या लष्कराची कुमक पाठविली आहे. इराणने देखील तुर्कीच्या सिरियातील लष्करी कारवाईचे गंभीर परिणाम संभवतात व याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनेल, असा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेषदूतांनी सिरियातील संघर्षावरून दिलेला इशारा लक्ष वेधून घेत आहे.

सिरियाच्या उत्तरेकडील भागात केलेल्या कारवाईत ‘आयएस’च्या तीन दहशतवाद्यांना ताबा घेतल्याचे तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणेने जाहीर केले. जगाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असलेल्या या दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचे दाखवून तुर्की सिरियावरील आपल्या आगामी हल्ल्यांसाठी समर्थन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा केला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून तुर्कीच्या हल्ल्यांमुळे या भागात निर्माण झालेली संघर्षस्थिती अतिशय चिंताजनक असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने सिरियासाठी नियुक्त केलेल्या विशेषदूतांनी म्हटले आहे.

चिंताजनक आणि धोकादायकतुर्की व संलग्न सशस्त्र गटांकडून सिरियातील कुर्द गटांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये महिन्यात वाढ झाली आहे. सिरियातील हा संघर्ष सीमा ओलांडून शेजारी देशांमध्ये देखील अस्थैर्य माजविल, असा इशारा विशेषदूत पेडरसन यांनी दिला. तुर्कीने सिरियाबरोबरच इराकमध्ये देखील असेच हल्ले सुरू केल्याचे पेडरसन यांनी लक्षात आणून दिले आहे. तर इस्रायलकडूनही सिरियाच्या इतर भागात हल्ले सुरू असल्याचा दावा राष्ट्रसंघाच्या विशेषदूतांनी केला.

गेल्या काही महिन्यांपासून सिरियातील हल्ल्यांची वाढलेली तीव्रता पाहता, येत्या काळात सिरियात मोठा संघर्ष भडकू शकतो, असे संकेत पेडरसन यांनी दिले. असे झाले तर सिरियासह या क्षेत्रात अस्थैर्य निर्माण होईल, असा इशारा पेडरसन यांनी दिला. राजकीय स्तरावर हा वाद मिटविण्यासाठी कुणीही तयार नसल्याची चिंता राष्ट्रसंघाच्या विशेषदूतांनी व्यक्त केली.

चिंताजनक आणि धोकादायकतुर्कीने सिरियात हल्ले चढवू नये, असा सल्ला रशियाने दिला होता. पण तुर्की सिरियातील कुर्दांच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्यावर ठाम आहे. अशा परिस्थितीत, रशियाने सिरियाच्या उत्तरेकडील भागासाठी अतिरिक्त लष्कर रवाना केले आहे. अलेप्पोच्या उत्तरेकडील ताल रिफात शहरात रशियन जवान दाखल झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. ताल रिफातपासून तुर्कीची सीमा अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे कुर्दांवर हल्ले चढविण्याआधी तुर्कीच्या लष्कराचा रशियन सैन्याशी सामना होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

दुसरीकडे तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिर अब्दुल्लाहियान यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. सिरियातील कुर्दांच्या ठिकाणांवर तुर्की करणाऱ्या हल्ल्यांना इराणने समर्थन द्यावे, यासाठी तुर्कीचे प्रयत्न सुरू आहेत. पण इराणने तुर्कीच्या या कारवाईला कडाडून विरोध केला आहे. तुर्कीच्या या कारवाईने प्रश्न सोडणार नाहीत तर अधिकच जटील बनतील, असे परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहियान यांनी बजावले.

दरम्यान, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलूसी अकार यांच्याशी चर्चा केली. सिरियातील तुर्कीच्या हल्ल्यांमुळे आपण आत्तापर्यंत आयएसविरोधी कारवाईत कमावलेले सारे काही गमावून बसू, असे याची जाणीव ऑस्टिन यांनी तुर्कीला करून दिली. याआधीही अमेरिकेने अशा स्वरुपाचे इशारे तुर्कीला दिले होते, पण तुर्कीने त्याकडे दुर्लक्ष केले होते.

leave a reply