कडाक्याच्या हिवाळ्यातही भारतीय सैन्य युद्धासाठी सुसज्ज असतील

- चिनी लष्कराला भारताकडून इशारा

नवी दिल्ली – लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कडक हिवाळ्यात युद्ध छेडून भारताला धक्का देण्याचा कट चीनने आखल्याचे दावे प्रसिद्ध झाले होते. चीनचे सरकारी मुखपत्रही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कडाक्याची थंडी भारतीय सैन्याला झेपणार नसल्याचे सांगून भारताला माघारीचा सल्ला देत होते. मात्र, इथल्या कडक हिवाळ्यातही भारतीय सैन्य युद्धासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि ४० फूटाचे बर्फाचे थर साचलेले असतानाही, भारतीय सैन्याच्या रसदीचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे, असे सांगून भारताच्या माजी लष्करी अधिकार्‍यांनी चीनच्या प्रचारयुद्धाला सडेतोड प्रत्युत्तर दिले.

भारतीय सैन्य

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्यासाठी अत्यावश्यक साहित्य व रसद यांचा पुरवठा सुरू झाला आहे. त्यासाठी शेकडो ट्रक्स सामान घेऊन भारतीय सैन्याच्या पोस्टजवळ जात असल्याचे दिसत आहे. वायुसेनेची अवजड मालवाहतूक करणारी सी-१७ ग्लोबमास्टर विमाने व अवजड वाहतूक करणारी चिनूक हेलिकॉप्टर्स लडाखच्या सीमेवर सक्रीय आहेत. ही सारी हिवाळ्याची तयारी असून पुढच्या काळात वाहतुकीचे सारे मार्ग बंद झाले तरी, भारतीय सैन्याला आवश्यक गोष्टीची कमतरता भासणार नाही, याची दक्षता याद्वारे घेतली जात आहे.

भारतीय सैन्याच्या या हालचालीची दखल चीनला घ्यावी लागली. या क्षेत्रात भारतीय सैन्य प्रदिर्घ काळ तैनातीची तसेच कुठल्याही क्षणी युद्धाची तयारी करीत असल्याची बाब चीनला चांगलीच खटकली आहे. शिवाय भारतीय सैन्याचे मनोबल उच्च असल्याची जाणीवही चीनला झाली आहे. म्हणूनच, चीनने मानसिक दबावतंत्राचे निरनिराळे प्रयोग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू केले आहेत. या ठिकाणी लाऊडस्पिकर्स लावून चिनी लष्कराकडून भारतीय सैनिकांना हिंदीतून संदेश दिला जात आहे. यामध्ये, तुमच्या या स्थितीला तुमचे नेते जबाबदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. भारतीय सैन्यानेही इथे लाऊडस्पिकर्स लावून चीनला उत्तर देण्यास सुरुवात केले आहे. त्याचबरोबर, लडाखच्या क्षेत्रात भारतीय सैन्य युद्धासाठी तयार नाही, भारताने इथे पायाभूत सुविधा तयार केलेल्या नाहीत, या आरोपांनाही भारतीय लष्कराकडून सडेतोड प्रत्युतर दिले जात आहे.

भारतीय सैन्य

भारतीय सैन्य या क्षेत्रात युद्धासाठी पूर्णपणे सज्ज आहे. अशा क्षेत्रात युद्धाचा भारतीय सैन्याकडे पूरेपूर अनुभव आहे आणि भारतीय सैन्याने त्याची संपूर्णपणे तयारीही केलेली आहे. ४० फूट बर्फाचे थर साचून वाहतूक बंद पडलेली असतानाही पुरवठा सुनिश्चित करण्याचे कौशल्य भारताकडे आहे, याकडे माजी लष्करी अधिकारी लक्ष्य वेधत आहेत. तर दुसर्‍या बाजूला अशा क्षेत्रात युद्धाचा अनुभव आणि कौशल्य चीनच्या लष्कराकडे नसल्याची बाब वारंवार उघड झाली आहे. विंटर इज कमिंग अर्थात हिवाळा येत आहे, हा सध्या भारतीय लष्करी विश्लेषकांचे परावलीचे वाक्य बनले आहे. लडाखच्या उणे ३० ते ४० तापमानात चीनचे जवान गोठून जातील, असा तर्क त्यामागे आहे. चीनलाही याची जाणीव झाली असून चिनी जवानांचे पाय या थंडीत आतापासूनच लटपटू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

भारतीय सैन्य

म्हणूनच शक्य त्या मार्गाने भारतावर दडपण आणण्याच्या योजनेवर चीनचे लष्कर काम करीत आहे. यासाठीच चीनच्या लष्कराने २९-३० ऑगस्ट रोजी व त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी लडाखच्या मुखपरी येथे गोळीबार करुन भारतीय सैन्याला चिथावणी दिली होती. यावेळी दोन्ही सैन्याकडून सुमारे १०० फैर्‍या इतका गोळीबार करण्यात आल्या, अशी माहिती उघड होत आहे. हा भारतीय सैनिकांना घाबरविण्याचा चीनचा आणखीन एक प्रयत्न होता आणि तो चीनवरच उलटल्याचे दिसत आहे. अपयशी ठरणार्‍या चिनी लष्कराच्या प्रत्येक प्रयत्नांमुळे भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास व मनोधैर्य अधिकाधिक दृढ होत चालले आहे.

leave a reply