जम्मू-काश्मीरमध्ये १६ लाखांहून अधिक जणांना रहिवाशी दाखला

नवी दिल्ली – नव्या रहिवाशी नियमांनुसार जून महिन्यापासून जम्मू-कश्मीरमध्ये १६ लाख ७९ हजार जणांना ‘डोमिसाईल सर्टिफिकेट’ मंजूर झाल्याची माहिती, जम्मू काश्मीर प्रशासनाने दिली आहे. रहिवाशी दाखला मिळालेल्यांपैकी १९,५७१ जण पाकिस्तानी निर्वासित आहेत. याशिवाय वाल्मिकी आणि गोरखा समुदायाच्या हजारो जणांना रहिवाशी दाखला मिळाला आहे.

रहिवाशी दाखला

गेली कित्येक वर्ष जम्मू-काश्मीरमध्ये राहूनही या सर्वाना जम्मू-काश्मीरचा रहिवाशी मानण्यात येत नव्हते. त्यामुळे रहिवाशी म्हणून नोकऱ्यांमध्ये संधी मिळविण्याचा, मतदान करण्याचा व स्थावर मालमत्ता विकत घेण्याचा अधिकार नव्हता. मात्र जम्मू-कश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर केंद्र सरकारने मार्चमध्ये रहिवाशी प्रमाणपत्र देण्याच्या नियमात बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. जून महिन्यापासून या रहिवाशी दाखल्यांचे वाटप सुरु झाल्यापासून केवळ साडे तीन महिन्यात तब्बल १६ लाखांहून अधिक रहिवाशी दाखल्यांना मिळालेली मंजुरी लक्षवेधी ठरत आहे.

रहिवाशी दाखला

जून महिन्यापासून १४ सप्टेंबरपर्यंत जम्मू आणि काश्मीरमधल्या २० जिल्ह्यातल्या नागरिकांना हे दाखले देण्यात आले आहेत. यामधील १२ लाख जण जम्मू विभागातून आणि चार लाख काश्मीर विभागातील आहेत. या डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी या आधी तहसीलदार कार्यालयात अर्ज करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली होती. मात्र कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.

leave a reply