भारतीय नौदल निर्भयतेने देशाचे रक्षण करीत आहे

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली/विशाखापट्टणम् – भारतीय नौदल निर्भयतेने देशाच्या किनारपट्टीचे संरक्षण करीत आहे. त्याचवेळी आवश्‍यकता भासल्यास मानवतावादी सहाय्य देखील पुरवित आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नौदलाच्या शौर्य, धैर्य आणि व्यावसायिकतेला आपण सलाम करतो, असे सांगून नौदलाची प्रशंसा केली. दरम्यान, हिंदी महासागर क्षेत्रातील धोक्यांमध्ये वाढ झाल्याचे सांगून ईस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल ए. के. जैन यांनी याविरोधात सावधानतेचा इशारा दिला आहे.

भारतीय नौदल

1971 च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर घणाघाती हल्ला चढविला होता. या हल्ल्यात पाकिस्तानच्या युद्धनौकांना जलसमाधी मिळाली होती. 71 सालच्या या युद्धात भारताला निर्णायक विजय मिळाला, त्यामागे नौदलाने पाकिस्तानला दिलेल्या या दणक्याचाही मोठा वाटा होता. 4 डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने हल्ला चढवून मिळविलेल्या यशाचे दरवर्षी ‘नौदल दिन’ साजरा करून अभिमानाने स्मरण केले जाते.

यावर्षीही नौदल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून नौदलाचे वरिष्ठ अधिकारी देशासमोर असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदल सज्ज असल्याची ग्वाही देत आहेत. विशेषतः चीनकडून भारताला मिळत असलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्याची जय्यत तयारी नौदलाने केल्याची घोषणा नौदलप्रमुख ॲडमिरल करमबिर सिंग यांनी एकाच दिवसापूर्वी केली होती. या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान तसेच संरक्षणमंत्र्यांनी नौदलासाठी विशेष संदेश दिला आहे. भारतीय नौदलाला तोड नसल्याचे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नौदलाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

दरम्यान, ईस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल ए. के. जैन यांनी हिंदी महासागर क्षेत्रातील धोक्यांचा उल्लेख करून या आघाडीवर नौदल सजग असल्याचे म्हटले आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील धोक्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नौदलाने आपले लक्ष या क्षेत्राकडे केंद्रीत केले असून इथे अथकपणे गस्त सुरू आहे. यासाठी ‘पी-8आय’ टेहळणी विमाने, डॉर्नियर विमाने तसेच नौदलाच्या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जात आहे. पुढच्या काळात आणखी चार ‘पी-8आय’ टेहळणी विमाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहितीही व्हाईस ॲडमिरल ए. के. जैन यांनी दिली.

हिंदी महासागर क्षेत्रात आपल्या नौदलाच्या युद्धनौका व पाणबुड्यांचा वावर वाढवून चीन भारताच्या इथल्या नैसर्गिक प्रभावाला आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र भारतीय नौदलाचे सामर्थ्य व सजगता यामुळे आत्तापर्यंत इथे कुठलीही आगळीक करू धजावला नाही, असे व्हाईस ॲडमिरल ए. के. चावला यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. तर नौदलप्रमुख ॲडमिरल करमबिर सिंग यांनी चीनच्या नौदलाने भारताविरोधात आगळीक केली, तर त्याला उत्तर देण्याची संपूर्ण तयारी नौदलाने केलेली असल्याचे बजावले आहे.

leave a reply