लष्करासाठी वरिष्ठ पदांच्या निर्मितीवर संरक्षण मंत्रालयाचे शिक्कामोर्तब

नवी दिल्ली – लष्करासाठी दोन नव्या पदांची निर्मिती करण्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयावर संरक्षण मंत्रालयाने शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे. यानुसार लष्करी मोहीम आणि धोरणात्मक योजना आखण्यासाठी स्वतंत्र उपलष्करप्रमुखपद तयार करण्यात येत आहे. त्याचवेळी प्रचारयुद्धाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आणखी एका पदाची निर्मिती करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. बदलत्या काळाच्या गरजेनुसार लष्करासाठी आवश्‍यक असलेल्या सुधारणांचा पहिला टप्पा म्हणून या निर्णयाकडे पाहिले जाते.

संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्करासाठी आणखी एका उपलष्करप्रमुखपदाची निर्मिती करण्याची आवश्‍यकता भासू लागल्याने हा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतल्याचे दावे सूत्रांकडून केले जातात. फार आधीपासून तशी मागणी केली जात होती. अतिशय महत्त्वाच्या लष्करी मोहिमा, त्यांची आखणी व त्यासाठी आवश्‍यक असलेल्या साहित्याचा तसेच इतर गोष्टींचा पुरवठा आणि लष्कराचा गुप्तचर विभाग, हे सारे नव्या उपलष्करप्रमुखपदाच्या अखत्यारित येईल. सध्या ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स’पदावर कार्यरत असलेले लेफ्टनंट जनरल परमजित सिंग यांची या ‘डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (स्ट्रॅटेजी) पदावर नियुक्ती केली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

आत्ताच्या काळात हायब्रिड वॉर अर्थात प्रचारयुद्धाला आलेले असाधारण महत्त्व लक्षात घेऊन, यासाठी स्वतंत्र पद तयार केले जात आहे. सध्या चीन व पाकिस्तान या शेजारी देशांकडून भारताच्या विरोधात जहरी अपप्रचार सुरू आहे. विशेषतः काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारताने मागे घेतल्यानंतर, तसेच डोकलाम व गलवानमध्ये चीनबरोबर झालेल्या संघर्षानंतर, प्रचारयुद्धात देशाची बाजू अधिक आक्रमकपणे मांडण्याची आवश्‍यकता प्रकर्षाने समोर येत होती.

काही माजी लष्करी अधिकारी स्वतःहून पुढाकारघेऊन देशाची बाजू मांडून भारताच्या विरोधातील अपप्रचाराला मीडिया तसेच सोशल मीडियावरून उत्तर देत आहेत. पण लष्कराने अधिकृत पातळीवर प्रचारयुद्धाकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आवश्‍यकता आहे, असे या माजी लष्करी अधिकाऱ्यांचेही म्हणणे होते. चीन आणि पाकिस्तानसारखा देश देखील प्रचारयुद्धात भारताच्या खूपच पुढे असल्याची खंत या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होते. त्या पार्श्‍वभूमीवर, संरक्षण मंत्रालयाने ‘इनफॉर्मेशन वॉरफेअर’ अर्थात प्रचारयुद्धाला प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या या पदाच्या निर्मितीचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

leave a reply