‘आयएस’कडून युरोपात दहशतवादी हल्ले चढविण्याची तयारी

- ब्रिटनच्या माजी गुप्तचर अधिकाऱ्याचा दावा

लंडन – ‘आयएस’ ही दहशतवादी संघटना येत्या काही दिवसात ब्रिटनसह युरोपात दहशतवादी हल्ले चढविण्याच्या तयारीत आहे, असा दावा ब्रिटनचे माजी गुप्तचर अधिकारी ऐमन डीन यांनी दिला. ‘आयएस’चे सिरिया व लिबियातील गट हल्ल्यांचे कट आखत असल्याचेही डीन यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे. गेल्या दोन महिन्यात ‘आयएस’ने फ्रान्स तसेच ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ले चढविले होते. या पार्श्‍वभूमीवर ब्रिटीश गुप्तचर अधिकाऱ्यांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

युरोपात दहशतवादी हल्ले

लंडनमध्ये झालेल्या एका सुरक्षाविषयक बैठकीदरम्यान ‘एमआय6’ या गुप्तचर संघटनेचे माजी अधिकारी असणाऱ्या डीन यांनी संभाव्य दहशतवादी हल्ल्यांबाबत इशारा दिला. ‘आयएसचा वरिष्ठ कमांडर ओमर अल-शिसानी युरोपिय देशांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याची तयारी करीत आहे. या हल्ल्यांसाठी तुर्की तसेच उत्तर आफ्रिकी देशांच्या माध्यमातून युरोपात दहशतवादी धाडले जातील. ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीत दहशतवादी हल्ले होऊ शकतात. या देशांमध्ये ख्रिसमसच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन शिथिल करण्याचे संकेत देण्यात आले असून त्याचा फायदा दहशतवादी उचलतील’, असे डीन यांनी बजावले.

युरोपात दहशतवादी हल्ले

इराक व सिरियात ‘आयएस’ला पराभूत करण्यात यश मिळाले असले तरी त्यानंतरही युरोपात ‘लोन वुल्फ’ प्रकारात दहशतवादी हल्ले झाले होते, याकडे ब्रिटीश गुप्तचर अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. उत्तर सिरिया तसेच लिबियात अद्यापही ‘आयएस’चे दहशतवादी सक्रिय असून युरोपात होणाऱ्या हल्ल्यांमागे याच भागातील गट असतील, असा दावा डीन यांनी केला आहे. येत्या काही दिवसात या भागातून युरोपात दहशतवाद्यांची लाट आलेली दिसेल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

युरोपात दहशतवादी हल्ले

ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यात फ्रान्स व ऑस्ट्रियामध्ये ‘आयएस’ने चार दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये 10हून अधिक जणांचा बळी गेला असून युरोपिय देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. युरोप दहशतवादापुढे कधीच झुकणार नाही, अशी ग्वाही देत युरोपिय नेत्यांनी कट्टरपंथिय गट तसेच दहशतवादाविरोधात आक्रमक मोहीम हाती घेतल्याचे जाहीर केले होते. फ्रान्स व ऑस्ट्रियामध्ये व्यापक स्वरुपात ही मोहीम सुरू असून दहशतवादी संघटनांचे समर्थक असणाऱ्या शेकडो कट्टरपंथियांना ताब्यात घेण्यात आले आहे. फ्रान्स व ऑस्ट्रियासह ब्रिटनने दहशतवादविरोधी मोहीम तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

ब्रिटनच्या सरकारने दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याची शक्यता वाढल्याबाबत दक्षतेचा इशाराही जारी केला आहे. युरोपिय देशांमध्ये गेल्या सहा वर्षात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. यामागे आखाती व आफ्रिकी देशांमधून होणारी निर्वासितांची घुसखोरी हे प्रमुख कारण असल्याचे आरोप करण्यात येत होते. युरोपिय नेतृत्त्वाने घुसखोरीबाबात सौम्य भूमिका घेऊन सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे ठपकाही पत्रकार तसेच विश्‍लेषकांनी ठेवला होता.

leave a reply