भारतीय सैन्याने चीनच्या सीमेवर मोक्याची ठिकाणे ताब्यात घेतली

- माध्यमांचा दावा

नवी दिल्ली – रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये भारत व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक सुरू असताना, चीनच्या सरकारी मुखपत्राने दिलेल्या धमक्या माध्यमांमध्ये गाजत होत्या. त्याचवेळी लडाखमधील पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिणेकडील सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणार्‍या ‘फिंगर ४’ टेकड्यांवर भारतीय सैन्याने ताबा घेतल्याच्या बातम्या भारतीय वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केल्या आहेत. यामुळे पुढच्या काळात चिनी लष्कराला भारतीय सैन्याच्या विरोधात कारवाई करणे अधिकच अवघड बनणार आहे.

चीन आपली भूमी भारतासाठी सोडून युद्ध टाळण्याचा प्रयत्‍न करील, असा गैरसमज भारताने करुन घेतला आहे. पण चीनच्या हालचाली जोखण्यात भारताने फार मोठी धोरणात्मक चूक केलेली आहे’, असे शेरे चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने मारले आहेत. नेहमीप्रमाणे ग्लोबल टाईम्सच्या ताज्या लेखातही भारताला भयंकर परिणामांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भारताने लडाखमधून माघार घेतल्याखेरीज शांतता प्रस्थापित होणार नाही. अमेरिकेच्या सहाय्याने चीनला झुकविता येईल, या भ्रमात भारताने राहू नये, असे ग्लोबल टाईम्सने बजावले आहे.

दरम्यान, भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अत्यंत मोक्याच्या मानल्या जाणार्‍या ‘फिंगर ४’ वरील टेकड्यांचा ताबा घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत. याबाबतचे सारे तपशील उघड झालेले नसले तरी चीनबरोबरील या संघर्षात भारताने घेतलेली ही मोठी आघाडी ठरते, असे दावे केले जातात. यामुळे चीनला पुढच्या काळात भारताच्या हद्दीत आपले जवान घुसविणे अवघड जाईल. कारण या टेकड्या ताब्यात आल्याने उंचावरुनच चिनी लष्कराच्या हालचाली भारतीय सैन्याला दुरुनच टिपता येऊ शकतात. यामुळे चीनच्या बेचैनीत वाढ झाली असून चीनचे जवान ही ठिकाणे ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करू शकतात, असा इशारा विश्लेषक देत आहेत.

मात्र कुठल्याही परिस्थितीत चिनी जवानांना या क्षेत्रात घुसखोरी करण्याची संधी देऊ नका, असे स्पष्ट आदेश भारतीय सैनिकांना देण्यात आले आहेत. चिनी सैनिकांना रोखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक भारतीय सैन्याला मिळालेली आहे. यासंदर्भातील बातम्या गुरुवारच्या सकाळपासूनच भारतीय वृत्तवाहिन्यांवर प्रसारित केल्या जात होत्या. दरम्यान, मॉस्को येथे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांची द्विपक्षीय चर्चा सुरू असतानाच, माध्यमांमध्ये सीमेवरील तणाव वाढल्याच्या बातम्या येत होत्या. याआधी ‘एससीओ’ संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची चीनच्या संरक्षणमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा झाली होती. मात्र या चर्चेतून काही निष्पन्न झाले नव्हते.

leave a reply