सिरियातील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सात दहशतवादी ठार

- सिरियन मानवाधिकार संघटनेचा दावा

दमास्कस – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियात हवाई हल्ले चढविले असून सिरियन हवाई सुरक्षा यंत्रणेने हे हल्ले यशस्वीरित्या मोडून काढल्याचा दावा येथील सरकारी माध्यमांनी केला. तर सिरियातील या हवाई हल्ल्यांमध्ये इराणसंलग्न संघटनेचे किमान सात दहशतवादी ठार झाल्याचे सिरियन मानवाधिकार संघटनेचे म्हणणे आहे. गेल्या ३२ महिन्यांमध्ये इस्रायलने सिरियातील इराणच्या २७० ठिकाणांना लक्ष्य केले असून यामध्ये इराण व इराणसंलग्न गटाचे ५०० हून अधिक जण ठार झाल्याचा दावाही या संघटनेने केला आहे. दरम्यान, इस्रायलने या हल्ल्यांबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

सिरियातील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सात दहशतवादी ठार - सिरियन मानवाधिकार संघटनेचा दावाशुक्रवारी पहाटे सिरियाच्या अलेप्पो शहराजवळ जोरदार हवाई हल्ले झाले. अलेप्पोच्या दक्षिणेकडील अल-सफिराह येथील लष्करी तळावर हे हल्ले झाल्याचे ‘सना’ या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. इराणसंलग्न ‘इराक हिजबुल्लाह’ या गटाचे क्षेपणास्त्र तळ असलेल्या ‘अल-सफिराह’च्या दिशेने सदर हल्ले चढविण्यात आले होते. पण सिरियन लष्कराच्या सज्ज असलेल्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी इस्रायलचे हे सर्व हल्ले उधळून लावले. इस्रायलचा एकही क्षेपणास्त्र आपल्या हद्दीत कोसळला नसल्याचा दावा सिरियन वृत्तवाहिनीने केला. मात्र सिरियातील मानवाधिकार संघटनेने या हल्ल्यांबाबत दिलेली माहिती सिरियन वृत्तवाहिनीपेक्षा वेगळी आहे.

सिरियातील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सात दहशतवादी ठार - सिरियन मानवाधिकार संघटनेचा दावासिरियाच्या उत्तरेकडील, तुर्कीच्या सीमेजवळील या अल-सफिराह येथे चढविलेल्या हवाई हल्ल्यात इराणसंलग्न गटाचे लष्करी तळ पूर्णपणे उद्‍ध्वस्त झाले असून या हल्ल्यात सात दहशतवादी मारले गेले आहेत. सदर तळावर मोठ्या संख्येने दहशतवादी असल्यामुळे बळींची संख्या वाढण्याची शक्यताही मानवाधिकार संघटनेने वर्तविली आहे. या व्यतिरिक्त सिरियाच्या पूर्वेकडील देर अल-झोर भागातील अल-मयादिन शहराच्या जवळही हवाई हल्ले झाले. येथील हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर हे हल्ले चढविण्यात आल्याचे सिरियन मानवाधिकार संघटनेचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर गेल्या ३२ महिन्यांमध्ये इस्रायली लढाऊ विमानांनी सिरियातील इराणच्या लष्करी तसेच इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर भीषण हल्ले चढविल्याचा दावा केला आहे.

सिरियातील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सात दहशतवादी ठार - सिरियन मानवाधिकार संघटनेचा दावा२०१८ सालाच्या सुरुवातीपासून ते या सप्टेंबर महिन्यापर्यंत इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियात ७९ वेळा हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये २७० ठिकाणांना लक्ष्य केले असून यात शस्त्रास्त्रांची गोदामे, इमारती, लष्करी मुख्यालये नष्ट करण्यात आली. सिरियातील राजधानी दमास्कस्पासून देर अल-झोर, अलेप्पो, हमा, होम्स, सुवेदा, दरा आणि कुनित्रा या भागातील ठिकाणांवर हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये ५०९ जण ठार झाले असून यात २३ नागरिक वगळता इतर सर्व इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसचे जवान, हिजबुल्लाह तसेच इराक-सिरियातील इराणसंलग्न गटांच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे सिरियन मानवाधिकार संघटनेने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

दरम्यान, सिरियातील इराणचे तळ आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. म्हणून सिरियातील इराण व इराणशी संबंधित दहशतवादी संघटनांना रोखण्यासाठी त्यांच्या ठिकाणांवर हल्ले चढविणार असल्याचे इस्रायलच्या लष्करी अधिकार्‍यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटले होते. पण इस्रायलने सिरियन माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणार्‍या हवाई हल्ल्यांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

leave a reply