देशातील कोरोनाच्या बळींची संख्या ७५ हजारांवर

रुग्णांची संख्या ४५ लाखांच्या पुढे पोहोचली

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या ७५ हजारांच्या पुढे गेली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसातच १० हजाराहून अधिक रुग्णांचा कोरोनाने देशभरात मृत्यू झाला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून देशात दरदिवशी सरासरी एक हजार जण दगावत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रातच ४४८ जणांचा बळी गेला आहे.

देशात बुधवारपासून गुरुवारच्या सकाळपर्यंत सुमारे १२०० जण दगावले आणि ९७ हजार नवे रुग्ण आढळले. गुरुवारी रात्री विविध राज्यांनी जाहीर केलेली आकडेवारी पाहता तितकेच नवे रुग्ण आढळल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्रात बुधवारी २३ हजार ८१६ नवे रुग्ण आढळले होते, तर गुरुवारी २३ हजार ४४६ नवे रुग्ण आढळले. यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे, तसेच बळींची संख्या २८ हजारांच्या पुढे गेली आहे.

कर्नाटकात चोवीस तासात १२९ जण दगावले आणि ९२१७ नवे कोरोना रुग्ण आढळले. आंध्रप्रदेशात ६८ जणांचा मृत्यू झाला आणि १०१७५ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी तामिळनाडूत ६४ जणांचा बळी गेला आणि ५ हजार २२८ नवे रुग्ण आढळले. उत्तरप्रदेशात ९४ जणांचा मृत्यू झाला आणि ७ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये एका दिवसात ४१ जण दगावले, तर ३११२ जण नवे रुग्ण सापडले. दिल्लीत चोवीस तासात ५८ जणांचा बळी गेला आणि ४,३०८ नव्या रुग्णांची नोंद झाली.

leave a reply