जगाची फार्मसी ही भारताची ओळख अधिकच ठळक बनली

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – 72 देशांना कोरोना प्रतिबंधक लसी पुरवून भारताने जगाची फार्मसी ही आपली ओळख अधिकच ठळक केली आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले. राज्यसभेत बोलताना जयशंकर यांनी भारताकडून जगाला पुरविल्या जाणार्‍या लसींची माहिती दिली. दुबळ्या देशांपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस पुरविण्याचे धोरण अतिशय प्रभावी ठरते आहे. निदान जगातला एक तरी देश ही लस सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, हा संदेश यामुळे मिळालेला आहे, असे सांगून परराष्ट्रमंत्र्यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

कोरोनाची साथ बळावल्यानंतर जगभरातील प्रमुख देश भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहू लागले होते. कोरोनाचा सामना करीत असताना, भारताच्या वैद्यकीय क्षेत्राचे आपल्याला फार मोठे सहाय्य मिळू शकते, याची जाणीव जगाला झाली होती. जगाची फार्मसी मानल्या जाणार्‍या भारतात विकसित झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसींची जगभरात मागणी होत आहे, याकडे परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. मात्र दुबळ्या व गरीब देशांपर्यंत देखील ही लस पोहोचविण्याचे प्रयत्न करणार्‍या भारताने क्षेत्रानुसार या लसींचा पुरवठा करण्याचे धोरण स्वीकारले.

सर्वात आधी शेजारी देशांना कोरोनाच्या लसी पुरविणार्‍या भारताने पुढच्या काळात आखाती, आफ्रिकन व लॅटिन अमेरिकन देशांनाही या लसी पुरविल्या आहेत. भारतीय कंपन्या इतरांशी करार करून या लसींचा पुरवठा करीत आहे, याकडेही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्ष वेधले. मुख्य म्हणजे जगाची फार्मसी ही भारताची ओळख यामुळे अधिक ठळक बनल्याचे सांगून जयशंकर यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. केवळ कोरोनाची लसच नाही, तर हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, पॅरासिटामल व इतर औषधांचा भारताने 150 देशांना केलेला पुरवठा देखील महत्त्वाचा ठरतो. या 150 पैकी 82 देशांना भारताने ही औषधे सहाय्य म्हणून पुरविली होती, असे परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भारतात विकसित झालेल्या लसींमुळे तसेच या लसींचा पुरवठा करण्याच्या उदार धोरणांमुळे चीनची फार मोठी हानी झाली आहे. आधीच कोरोनाची साथ चीनमुळे जगाला मिळाली, अशी टीका होत आहे. वुहानमध्ये आलेल्या या साथीची माहिती चीनने वेळीच उघड केली असती, तर ही साथ चीनमध्येच रोखता येणे शक्य होते. पण चीनने बराच काळ याबाबतची माहिती दडवून ठेवली. अजूनही चीन या साथीच्या उगमाबाबतची सारी माहिती उघड करायला तयार नाही. चीनकडून जगाला कोरोनाची साथ मिळत असताना, भारताने मात्र यावरील औषधे व लसींचा पुरवठा केल्याचा संदेश जगभरात गेला आहे.

यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळून निघाली आहे. एरवी भारतविरोधी प्रचारमोहिमेत हिरिरीने सहभाग घेणार्‍या पाश्‍चिमात्य माध्यमांनाही भारताने जगाला पुरविलेल्या लसींची दखल घ्यावी लागली. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनीही भारताची प्रशंसा केली. तसेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही भारत जगाची फार्मसी असल्याचे म्हटले होते.

leave a reply