रफायल वायुसेनेत सहभागी करुन भारताचा चीनला इशारा

अंबाला – पाच रफायल विमानांचा वायुसेनेतील समावेश हा भारताच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देणार्‍यांसाठी जरब बसविणारा संदेश असल्याचा खणखणीत इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला. अंबाला येथील १७ स्क्वाड्रन ‘गोल्ड्न ऍरोज’मधील रफायल विमानांच्या समावेशाबाबत बोलताना संरक्षणमंत्र्यांनी थेट नाव न घेता चीनला लक्ष्य केले. त्याचबरोबर भारताची जबाबदारी या क्षेत्रात शांती व स्थैर्य प्रस्थापित करण्यापर्यंत मर्यादित नसून इंडो-पॅसिफिक, हिंदी महासागर क्षेत्रातही शांती प्रस्थापित करण्याला देखील भारत महत्त्व देत असल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. तर सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रफायल विमानांचा वायुसेनेतील प्रवेश अत्यंत उचित वेळी झाला, असे सुचक उद्‍गार वायुसेनाप्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी काढले आहेत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांच्या उपस्थितीत रफायल विमानांचे पहिले पथक गुरुवारपासून भारतीय वायुसेनेच्या सेवेत सक्रिय झाले. यावेळी ‘वॉटर कॅनन’ची सलामी देऊन रफायलचे स्वागत करण्यात आले. तर सुखोई-३०एमकेआय आणि स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांनी चित्तथरारक हवाई कसरती करुन भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले. यापैकी तेजसची ‘कोब्रा मनूव्हर’ लक्षवेधी ठरली. तर रफायल विमानांनी कमी वेगाने फ्लाय-पास्ट करुन दाखविले. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झालेला असताना, रफायल विमानांच्या पथकाचा वायुसेनेतील समावेश आणि वायुसेनेच्या आघाडीच्या विमानांनी केलेल्या कसरती महत्त्वाच्या ठरत आहेत. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन तसेच पाकिस्तानला इशारा दिला.

भारताच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देणार्‍यांसाठी रफायल विमानांचा वायुसेनेतील समावेश हा जरब बसविणारा संदेश ठरतो. सीमेवर निर्माण झालेल्या किंवा निर्माण करण्यात आलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रफायल विमानांचे महत्त्व वाढले आहे. भारत कुठल्याही परिस्थितीत आपल्या सार्वभौमत्त्व आणि अखंडत्वाशी तडजोड करणार नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी भारत आवश्यक ते सर्व प्रयत्‍न करील, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर रशिया दौर्‍यातही आपण हीच भूमिका मांडल्याची माहिती संरक्षणमंत्र्यांनी दिली. या व्यतिरिक्त या क्षेत्रासह इंडो-पॅसिफिक आणि हिंदी महासागर क्षेत्रात शांती व स्थैर्य प्रस्थापित करण्याला भारत महत्त्व देत असल्याचे राजनाथ सिंग म्हणाले. काही दिवसांपूर्वी भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी देखील हीच भूमिका मांडली होती. अंबाला येथील रफायल विमानांच्या वायुसेनेतील सहभागाच्या कार्यक्रमासाठी संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत आणि वायुसेनाप्रमुख एअर चिफ मार्शल आर. के. एस. भदौरिया देखील होते.

देशाच्या सीमेवर निर्माण झालेली सुरक्षा विषयक परिस्थिती लक्षात घेता, रफायल विमानांचा वायुसेनेतील समावेश उचित वेळी झालेला आहे, असे उद्‍गार वायुसेनाप्रमुखांनी यावेळी काढले. वेगळ्या शब्दात रफायल विमानांचा वापर कारवाईसाठी होऊ शकतो, असा संदेश वायुसेनाप्रमुख एअर चिफ मार्शल भदौरिया यांनी दिला आहे. रफायल विमाने आता कुठे भारतात दाखल झाली आहेत. भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांना याचे प्रशिक्षण घेण्यासाठी बराच कालावधी लागेल, असा दावा पाकिस्तानी हवाईदलाच्या माजी अधिकार्‍यांनी केला होता. त्यापार्श्वभूमीवर भारताच्या वायुसेनाप्रमुखांनी रफायलच्या वापरासाठी वायुसेना सज्ज असल्याचे सांगून चीनसह पाकिस्तानलाही खडसावले आहे.

leave a reply