पंतप्रधान मोदी आणि सौदीच्या राजे सलमान यांची फोनवरून चर्चा

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजे सलमान बिनअब्दुल अजीज अल सौद यांनी फोनवरून चर्चा केली. तीनच दिवसांपूर्वी सौदी अरेबियाचे भारतातील राजदूत डॉ. सौद बिन-मोहम्मद अल-सती यांनी भारत आणि सौदी अरेबियामधील सहकार्या संबंधात महत्त्वाच्या घोषणा येत्या काळात होतील. दोन्ही देश मजबूत लष्करी सहकार्याकडे वाटचाल करत आहेत,अशी माहिती भारतीय माध्यमांशी बोलताना दिली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि सौदीच्या राजांमध्ये झालेल्या चर्चेला महत्त्व आले आहे. तसेच सौदी अरेबियाचे पाकिस्तानबरोबरील संबंध ताणले गेले ,असताना भारताचे सौदीबरोबर वाढते सहकार्य लक्षवेधी ठरत आहे.

फोनवरून चर्चा

कोरोनाव्हायरसच्या साथी मुळे उभी राहिलेली आव्हाने आणि ‘जी20’चा अध्यक्ष म्हणून सौदी अरेबिया पार पडत असलेल्या भूमिकेवर सौदीच्या राजांबरोबर फोनवर चर्चा झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या साथी दरम्यान सौदी अरेबियातील भारतीयांना सहाय्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सौदीच्या राजे सलमान यांचे विशेष आभार मानले. दोन्ही देशांमध्ये बळकट होत असलेल्या द्विपक्षीय संबंधांवर दोघांनीही समाधान व्यक्त केले,असे पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र दोन्ही नेत्यांमधील या चर्चेचे यापेक्षा अधिक तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत.

तीनच दिवसांपूर्वी एका भारतीय माध्यमाला सौदीच्या राजदूतांनी दिलेली मुलाखतीत भारत आणि सौदीमध्ये विविध क्षेत्रात सहकार्य व्यापक होत असल्याचे म्हटले होते. दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांशी संबंधित माहितीची देवाण-घेवाण यासंदर्भात दोन्ही देश सतत संपर्कात आहेत. भारत आणि सौदी अरेबियामध्ये दहशतवादाविरोधात झालेल्या सहकार्याचे परिणाम दिसू लागले आहेत, असे सौदी ते राजदूत म्हणाले होते. तसेच दोन्ही देश मजबूत लष्करी सहकार्याच्या दिशेने पुढे जात आहेत, असेही सौदीच्या राजदूतांनी अधोरेखित केले होते. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी सौदी अरेबिया भारताला सर्वतोपरी सहाय्य करेल आणि यासाठी आपला देश वचनबद्ध असल्याचे सौदी अरेबियाच्या राजदूतांनी स्पष्ट केले होते.

सौदी अरेबियाचे आणि पाकिस्तानचे द्विपक्षीय संबंध ताणले गेले आहेत. ‘ओआयसी’मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी पाकिस्तानने केली होती. पण सौदीने ते नाकारल्यामुळे पाकिस्तानने सौदीच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे सौदी पाकिस्तानवर संतापलेला आहे. पाकिस्तानचा उधारीवरचा इंधन पुरवठाही सौदी अरेबियाने रोखला आहे. तसेच पाकिस्तानला अधिक कर्ज न देण्याचा आणि दिलेले कर्ज मागून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि सौदीमधील सहकार्य ही लक्ष वेधून घेणारी बाब ठरते.

leave a reply