युक्रेनमध्ये हस्तक्षेप केला तर पोलंडला ठेचून टाकू

मॉस्को/वॉर्सा/किव्ह – युक्रेनमधील युद्धात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर रशिया पोलंडला ठेचून टाकेल, असा इशारा रशियाचे वरिष्ठ नेेते व्लादिमिर शामानोव्ह यांनी दिला. पोलंडने युक्रेनमध्ये शांतीसैनिक पाठविण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. या प्रस्तावावर रशियातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. शामानोव्ह यांच्यापूर्वी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी, युक्रेनमध्ये शांतीसेना तैनात झाल्यास रशिया-नाटो थेट संघर्षाचा भडका उडेल, असे बजावले होते.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला जवळपास एक महिना पूर्ण होत असून या कालावधीत युद्ध अधिकच तीव्र झालेले दिसत आहे. अमेरिकेसह पाश्‍चात्य देश युक्रेनला मोठ्या प्रमाणात सहाय्य पुरवित असून त्यात अर्थसहाय्य, शस्त्रास्त्रे व इतर मानवतावादी सहाय्याचाही समावेश आहे. रशियाविरोधातील युद्धासाठी युक्रेनने परदेशी सैनिकांचा समावेश असलेली ‘फॉरेन लिजन’ही उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यात आता पोलंडने पुढे केलेल्या शांतीसेनेच्या प्रस्तावाची भर पडली आहे.

गुरुवारपासून सुरू होणार्‍या नाटोच्या बैठकीत पोलंड सदर प्रस्ताव मांडणार आहे. या प्रस्तावानुसार, पोलंडसह इतर नाटो सदस्य देशांमधील जवानांचा समावेश असलेल्या शांतीसैन्याची उभारणी करण्यात येत आहे. यात किमान १० हजार जवानांचा सहभाग निश्‍चित करण्यात आला आहे. पोलंडसह झेक रिपब्लिक व स्लोव्हेनियाने या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी या तिन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांनी युक्रेनला भेट दिली होती. अमेरिकेच्या होकारानंतर पुढील हालचालींना सुरूवात होईल, असे सांगण्यात येते.

मात्र, पोलंडसह इतर देशांनी सुरू केलेल्या या हालचालींचे तीव्र पडसाद रशियात उमटले आहेत. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अशा प्रकारची शांतीसेना म्हणजे अत्यंत बेजबाबदार पाऊल असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी अशारितीने नाटो देशांच्या तुकड्या युक्रेनमध्ये दाखल झाल्यास रशिया-नाटो थेट संघर्ष पेटेल, असेही परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी बजावले. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी पोलंडचे नेतृत्व राजकीयदृष्ट्या मूर्ख असल्याची संभावना केली आहे. तर रशियाच्या संसदेत उपसभापती असलेल्या शामानोव्ह यांनी पोलंडला ठेचण्याची धमकी दिली आहे.

‘रशियाच्या नेतृत्त्वाने इतर देशांना आपल्या सीमांची योग्य शब्दात ओळख करून देण्याची वेळ आली आहे. पोलंडने रशिया किंवा युक्रेनच्या सीमेत १० मीटरसुद्धा आत येण्याचा विचार करु नये. तसे केले तर युक्रेन युद्धाचा अंतिम टप्पा युक्रेन-पोलंड सीमेवर लढला जाईल. पोलंडवर हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसह तीव्र हल्ले चढविले जातील’, असा इशारा रशियन संसदेच्या उपाध्यक्षांनी दिला.

दरम्यान, ब्रिटनने युक्रेनला सहा हजार नवी क्षेपणास्त्रे पुरविण्याचे जाहीर केले आहे. यात ‘नेक्स्ट जनरेशन लाईट अँटी टँक वेपन्स’ व ‘जॅव्हलिन’ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त युक्रेनला अडीच कोटी पौंड अतिरिक्त संरक्षणसहाय्य पुरविण्यात येईल, असेही ब्रिटनकडून सांगण्यात आले.

leave a reply