बंगालच्या उपसागरात भारत बांगलादेशच्या नौदलाचा संयुक्त युद्धसराव सुरु

नवी दिल्ली – शनिवारपासून बंगालच्या उपसागरात भारत आणि बांगलादेशच्या नौदलाचा ‘बोंगोसागर’ नावाचा संयुक्त युद्धसराव सुरु झाला. महिनाभराच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात पार पडत असलेला हा भारतीय नौदलाचा दुसरा सागरी सराव ठरतो.

बंगालच्या उपसागरात भारत बांगलादेशच्या नौदलाचा संयुक्त युद्धसराव सुरुभारताकडून या सरावात पाणबुडीभेदी युद्धनौका ‘आयएनएस किल्टन’ आणि क्षेपणास्त्रे हल्ले करणारी ‘आयएनएस खुकरी’ या युद्धनौका सहभागी झाल्या आहेत. तसेच सागरी गस्ती विमान आणि हेलिकॉप्टर्स या सरावात सहभागी झाले आहेत. तर बांगलादेशकडून ‘बीएनएस अबु बकर’ आणि ‘बीएनएस पोट्रॉय’या युद्धनौका सहभागी झाल्या आहेत.

भारत आणि बांगलादेशमधील ‘बोंगोसागर’ या युद्धसरावाचे सरावाचे हे दुसरे वर्ष आहे. या सरावादरम्यान एकमेकांच्या युद्धनौकांवर हेलिकॉप्टर्स उतरविले जातील. आंतरराष्ट्रीय सागरी मोहिमांसाठी समन्वय वाढविणे हा त्यामागचा हेतू असल्याचे नौदलाने स्पष्ट केले. दरम्यान, ‘नेबरहुड फस्ट’ आणि ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ ऑफ ऑल इन द रिजन’ (सागर) या भारताच्या धोरणांतर्गत पंतप्रधान मोदी यांनी शेजारी देशांबरोबरील सागरी सहकार्य दृढ करण्याचे ठरविले आहे. हा सागरी सराव त्याचाच एक भाग ठरतो.

गेल्या महिन्यात बंगालच्या उपसागरात भारत आणि रशियाच्या नौदलाचा ‘इंद्रा’ सराव पार पडला होता. बंगालचा उपसागर श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार तसेच थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशियापर्यंत जोडणारा असल्यामुळे सामरिक दृष्टया हे सागरी क्षेत्र महत्त्वाचे ठरते. या सागरी क्षेत्रात महिनाभराच्या कालावधीत दोन वेळा भारतीय नौदलाचा सागरी सराव पार पडला आहे. यातून चीनला योग्य तो संदेश दिला जात आहे.

leave a reply