अमेरिका, इस्रायल आणि युएई इंधन सहकार्य प्रस्थापित करणार

दुबई – अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) लवकरच संयुक्त इंधन सहकार्य धोरण राबविणार आहे. तीनही देशांच्या इंधनमंत्र्यांमध्ये याबाबत महत्त्वाचा करार पार पडला आहे. या इंधन सहकार्याचा पॅलेस्टिनींना सर्वाधिक फायदा होईल, अशी माहिती युएईच्या सरकारी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. तर सदर इंधन सहकार्यामुळे या क्षेत्रातील संरक्षण सहकार्य देखील वाढेल, असा दावा संबंधित वृत्तसंस्थेने केला.

अमेरिका, इस्रायल आणि युएई इंधन सहकार्य प्रस्थापित करणारअमेरिका, इस्रायल आणि युएईमधील या इंधन सहकार्याबाबत शुक्रवारी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती सदर वृत्तसंस्थेने दिली. ‘संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, आणि इस्रायल या तीनही देशांनी अक्षय ऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता, इंधन, नैसर्गिक वायूची संसाधने त्याचबरोबर संबंधित तंत्रज्ञान आणि पाण्याचे पृथक्करण तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्यावर व्यावहारिक पावले उचलण्याची कबुली दिली आहे’, असे या निवेदनातून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर तीनही देशांची अर्थव्यवस्था वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांच्या ऊर्जाविषयक गरजा भागविण्यासाठी त्याचबरोबर ऊर्जाविषयक आव्हानांचा सामना करावा लागणार्‍या पॅलेस्टिनींसाठी सहाय्यक ठरेल, असा दावा या निवेदनातून केल्याचे सदर वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

युएई आणि बहारिन तेल उत्पादक देश आहेत, तर इस्रायल हा नैसर्गिक वायू उत्पादक देशांमध्ये समाविष्ट होईल. युएई, बहारिन यांनी इस्रायलबरोबर राजनैतिक सहकार्य प्रस्थापित केल्यानंतर या इंधनविषयक सहकार्याचा निर्णय घेण्यात आला होता. इस्रायली आणि युएईच्या ऊर्जामंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत इंधनविषयक सहकार्य आणि गुंतवणूक वाढविण्याबरोबर चर्चा पार पडली. यामध्ये युरोपिय देशांना नैसर्गिक वायूची निर्यात करणावरही उभय देशांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. येत्या काळात यावर घोषणा अपेक्षित असल्याचे आखातातील विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर अमेरिका, युएई आणि इस्रायलमधील या सहकार्यामागे क्षेत्रीय घडामोडींचाही समावेश असल्याचा दावा सिमॉन वॅटकिन्स यांनी केला आहे.

अमेरिका आणि इस्रायलबरोबर हे इंधन सहकार्य प्रस्थापित करुन युएईने इस्रायलबरोबरील संरक्षणविषयक सहकार्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे वॅटकिन्स यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी पर्शियन आखातातील आपल्या इंधनवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, युएई इंधन निर्यातीच्या सुरक्षेसाठी येत्या काळात इस्रायलबरोबर संरक्षण सहकार्य करू शकतो. तर इराणपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेच्या नेटवर्कचाही युएईला फायदा मिळू शकेल, असा दावा वॅटकिन्स यांनी केला.

leave a reply