अण्वस्त्रवाहू ‘शौर्य’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी

बालासोर – ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणी नंतर ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’कडून (डीआरडीओ) अण्वस्त्रवाहू ‘शौर्य’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र ८०० किलोमीटर दूरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. ‘शौर्य’च्या या नव्या आवृत्तीमुळे विद्यमान क्षेपणास्त्र यंत्रणा अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. चीनबरोबरील तणाव वाढत असताना घेण्यात आलेल्या या चाचणीचे महत्व वाढते.

अण्वस्त्रवाहू ‘शौर्य’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणीशनिवारी ओडिशाच्या बालासोर येथुन १२.१० वाजता डॉ. अब्दुल कलाम बेटावरून जमिनीवरून जामिनीवर मारा करणाऱ्या ‘शौर्य’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ‘शौर्य’ची नवी आवृत्ती हलकी आणि वापरण्यास सुलभ आहे. लक्ष्याच्या दिशेने जाताना अंतिम टप्प्यात हे क्षेपणास्त्र हायपरसॉनिक गती घेते, असे सूत्रांनी सांगितले.

शौर्यच्या निर्मितीत अनेक अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला आहे. त्याचा आकार खूप आटोपशीर आहे. त्याचा व्यास कमी असल्याने त्याला हवेचा अवरोध कमी होतो. हे क्षेपणास्त्र हजार किलोची स्फोटके वाहून नेण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्राची लांबी १० मीटर असून वजन ६.२ टन आहे. या क्षेपणास्त्राच्या खालच्या भागाकडे गॅस जनरेटर असून यशस्वी प्रक्षेपणासाठी त्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते.

‘डीआरडीओ’ स्टॅटेजिक क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात देशाला पूर्णतः स्वावलंबी बनवण्याच्या प्रयत्नात आहे. ‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीमुळे भारताची सध्याची क्षेपणास्त्र यंत्रणा अधिक बळकट होईल , असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वीच ” डीआरडीओ’ने स्वदेशी बनावटीच्या ”लेझर गाइडेड अँटी टॅंक क्षेपणास्त्रा”ची (एटीजीएम) यशस्वी चाचणी घेण्यात आली. अर्जुन रणगाड्यावरून डागण्यात आलेले हे क्षेपणास्त्र पाच किलोमीटर दूरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. त्यापूर्वी ‘ब्रह्मोस’ची चाचणी घेण्यात आली होती.

leave a reply