भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलियन नौदलाच्या मलाबार युद्धसरावामागे एकसमान ध्येय

- भारतीय नौदलप्रमुख ऍडमिरल करमबिर सिंग

नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात सुरू असलेल्या मलाबार युद्धसरावात सहभागी झालेल्या भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाची दृष्टी व ध्येय एकसमान आहे. मुक्त व खुले इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी हा युद्धसराव सुरू असून याद्वारे चारही देशांचे नौदल परस्परांमधील समन्वय व सहकार्य वाढवित आहेत, असे भारताचे नौदलप्रमुख ऍडमिरल करमबिर सिंग यांनी स्पष्ट केले. हे सांगत असताना हा सराव कुठल्याही देशाच्या विरोधात नसल्याचा दावा नौदलप्रमुखांनी केला. भारताकडून हा खुलासा करण्यात येत असला तरी चीन क्वाडचा हा सराव आपल्या विरोधातच असल्याचे सांगून त्याविरोधात भारताला इशारे देत आहे.

भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलियन नौदलाच्या मलाबार युद्धसरावामागे एकसमान ध्येय - भारतीय नौदलप्रमुख ऍडमिरल करमबिर सिंगदोनच दिवसांपूर्वी चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्समध्ये मलाबार युद्धसरावाचा उल्लेख करण्यात आला होता. अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांबरोबरील मलाबार सागरी सरावाच्या पार्श्‍वभूमीवर, लडाखच्या सीमावादात भारत आक्रमक बनल्याचे दावे ग्लोबल टाईम्सने केले होते. ‘चीनबरोबर संघर्षाचा प्रसंग ओढवला तर अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया आपल्या सहाय्याला येतील, या भ्रमात भारताने राहू नये. सदर या देशांबरोबरील सागरी सरावाचा वापर करून आपण सीमावादाबाबत चीनवर दडपण टाकू शकतो, असा समजही भारताने करून घेऊ नये’, असे इशारे ग्लोबल टाईम्सने दिले होते. याबरोबरच भारत सलामी स्लायसिंग अर्थात हळुहळू चीनच्या हद्दीत शिरून त्यावर अधिकार प्रस्थापित करीत असल्याचा आरोप देखील या मुखपत्राने केला होता.

चीनच्या सरकारी मुखपत्राने केलेल्या या शेरेबाजीतून चीनची अस्वस्थता व्यक्त होत आहे. सामरिक विश्‍लेषक देखील क्वाडच्या सहकार्यामुळे चीनच्या असुरक्षिततेत वाढ झाल्याचे दावे करीत आहेत. चीनची बाजू उचलून धरणारे विश्‍लेषक देखील क्वाडच्या नौदलाचे सहकार्य आकार घेत असताना, चीन बॅकफूटवर गेल्याचे मान्य करीत आहेत. अशा परिस्थितीत, भारताने पुन्हा एकदा क्वाडच्या सरावाचे लक्ष्य कुणी एक देश नसल्याचा निर्वाळा दिला. पण मुक्त व खुले इंडो-पॅसिफिक क्षेत्र हे या सरावात सहभागी झालेल्या देशांचे समान ध्येय असल्याचे सांगून भारताच्या नौदलप्रमुखांनी नेमक्या शब्दात चीनला संदेश दिला आहे.

१९९२ साली सुरू झालेल्या मलाबार युद्धसरावाचे स्वरुप द्विपक्षीय होते पण आता याचे स्वरूप पूर्णपणे बदलेले आहे. या युद्धसरावात आता विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, पाणबुड्या देखील सहभागी होत असून यामुळे भारत, अमरिका, जपान व ऑस्ट्रेलियन नौदलामधील समन्वय आणि सहकार्य अधिकच दृढ होत आहे. पुढच्या काळात आकस्मिक संकट खडे ठाकले, त्सुनामीसारखी आपत्ती आलीच, तर त्याला तोंड देण्याची सज्जता यामुळे वाढेल, असे सूचक उद्गार काढून नौदलप्रमुख ऍडमिरल करमबिर सिंग यांनी या सरावापासून होणारा लाभ अधोरेखित केला.

दरम्यान, मलाबारनंतर भारतीय नौदल ब्रिटनच्या विमानवाहू युद्धनौका एचएमएस एलिझाबेथबरोबर भारताच्या नौदलाचा युद्धसराव सुरू होणार आहे. याच्या आधी भारताने फ्रान्सच्या नौदलाबरोबर युद्धसराव केला होता. याचे फार मोठे दडपण चीनवर आले असून भारतीय नौदलाच्या क्षमतेत होत असलेली वाढ चीनच्या असुरक्षिततेत अधिकाधिक भर घालत आहे.

leave a reply