रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटन व अमेरिकेत महागाईचा भडका

महागाईचा भडकालंडन/वॉशिंग्टन – युक्रेन युद्धावरून रशियन अर्थव्यवस्थेचा कणा मोडणारे निर्बंध लादल्याची भाषा करणार्‍या पाश्‍चिमात्य देशांमध्ये महागाईचा जबरदस्त भडका उडाल्याचे समोर येत आहे. युक्रेनवरून रशियाला लक्ष्य करण्यात आघाडीवर असणार्‍या अमेरिका व ब्रिटनमध्ये महागाई निर्देशांकांनी नवे उच्चांक गाठले आहेत. पुढील काही महिन्यात त्यात अजून भर पडण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामुळे रशियावर लादलेल्या निर्बंधांचे सर्वाधिक परिणाम पाश्‍चिमात्य देशांमधील जनतेलाच भोगावे लागत असल्याचे उघड झाले आहे.

ब्रिटनमध्ये महागाई निर्देशांक ६.२ टक्क्यांवर गेल्याची नोंद झाली आहे. हा गेल्या ३० वर्षातील उच्चांक ठरला आहे. ब्रिटनमधील अन्नधान्य, फळे, इंधन यासह बहुतांश जीवनावश्यक उत्पादनांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यात महागाई अत्यंत वेगाने वाढत असून फक्त विजेच्या बिलांमध्ये तब्बल महागाईचा भडका५० टक्क्यांची भर पडल्याचा तक्रारीचा सूर जनतेतून उमटू लागला आहे. ब्रिटनमधील इंधनाच्या दरांनीही उच्चांकी पातळी गाठली असून त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून येत आहे. सरकार महागाई रोखण्यासाठी योग्य पावले उचलत नसल्याची नाराजीची भावना तीव्र होत असल्याचा दावा माध्यमांकडून करण्यात येत आहे.

ही वाढ पुढील काळात १० टक्क्यांच्या वर जाऊ शकते, असे भाकित मध्यवर्ती बँक असणार्‍या ‘बँक ऑफ इंग्लंड’ने वर्तविले आहे. महागाई रोखण्यासाठी बँकेने व्याजदरात वाढीची उपाययोजना केली असली तरी त्याने महागाईत बदल झालेला नाही. ब्रिटनचे अर्थमंत्री रिषी सुनाक यांनीही युक्रेनमधील युद्धामुळे ब्रिटनमधील दैनंदिन गरजांसाठी लागणारा खर्च वाढल्याची कबुली दिली आहे. ‘ऑफिस ऑफ बजेट रिस्पॉन्सिबिलिटी’ या यंत्रणेनेदेखील आपल्या अहवालात युक्रेनमधील परिस्थितीमुळे महागाई वाढत असल्याचे नमूद आहे.

महागाईचा भडकाब्रिटनपाठोपाठ अमेरिकेतही महागाईने नवे विक्रम नोंदविण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील महागाई निर्देशांक ७.९ टक्क्यांवर पोहोचला असून ही गेल्या चार दशकांमधील सर्वात मोठी वाढ ठरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून महागाई निर्देशांकात एकदाही घट झालेली नाही. नोव्हेंबर २०२० पासून सलग १४ महिने अमेरिकेतील महागाईत सातत्याने भर पडत आहे. युक्रेन युद्धावरून रशियावर निर्बंध लादून आपली पाठ थोपटून घेणार्‍या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी, वाढत्या महागाईबाबत आपण काही करू शकत नसून त्याचे सर्व खापर रशियावर फोडले आहे.

अमेरिका व ब्रिटनसह इतर आघाडीच्या युरोपिय देशांमध्येही महागाई भडकण्यास सुरुवात झाली असून त्याचा परिणाम आर्थिक मंदीत होऊ शकतो, असे अर्थतज्ज्ञ तसेच विश्‍लेषक बजावित आहेत.

leave a reply