रशियावरील निर्बंधांमुळे डॉलर व युरोची विश्‍वासार्हता धुळीस मिळाली

- राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

डॉलर व युरोमॉस्को – ‘गेल्या काही आठवड्यांमध्ये अनेक पाश्‍चिमात्य देशांनी रशियाचा निधी व मालमत्ता गोठविण्याचे बेकायदा निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकी डॉलर व युरो या दोन्ही चलनांची विश्‍वासार्हता धुळीस मिळाली आहे’, असा टोला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी लगावला. पुतिन यांनी यापूर्वी वारंवार अमेरिकी डॉलरच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून त्याला पर्याय शोधण्याचे आवाहन केले होते. मात्र युरो चलनाबाबत असे वक्तव्य करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी युरोपिय देशांनाही संदेश दिल्याचे दिसत आहे.

अमेरिका व मित्रदेशांनी रशियन अर्थव्यवस्थेवर जबरदस्त निर्बंध लादले असून रशियाची मध्यवर्ती बँक तसेच परकीय गंगाजळीला लक्ष्य केले आहे. रशियाकडे असलेल्या सोन्याच्या राखीव साठ्यांविरोधातही कारवाईची तयारी सुरू आहे. या निर्बंधांचा उल्लेख रशियाने आर्थिक युद्ध असा केला असून त्यातून मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अनेक अभ्यासगट तसेच अर्थतज्ज्ञांनी, पाश्‍चिमात्यांनी लादलेल्या निर्बंधांना रशियन अर्थव्यवस्था तोंड देऊ शकते, असा दावाही केला आहे.

याच पार्श्‍वभूमीवर रशियाने नैसर्गिक इंधनवायूच्या निर्यातीसाठी काही देशांकडून रुबल हेच चलन स्वीकारले जाईल, असे जाहीर केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी याची घोषणा केली. रशियात वापरण्यासाठी निर्बंध घातले आहेत, अशा चलनांचा वापर नैसर्गिक इंधनवायूच्या निर्यातीच्या व्यवहारांसाठी केला जाणार नाही, असे पुतिन यांनी सांगितले. रशियाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध नसलेल्या देशांसाठी ही तरतूद असल्याचेही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट केले.

leave a reply