सिरिया-इराकमधील आयएसचा प्रभाव वाढत आहे

- अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांचा इशारा

सिरिया-इराकवॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील आयएसच्या हल्ल्यांकडे जगाचे लक्ष लागलेले असताना, सिरिया-इराकमध्ये ही दहशतवादी संघटना आपला प्रभाव वाढवत चालली आहे. ही अतिशय चिंतेची बाब ठरते, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍याने दिला. तर आयएसविरोधी कारवाई हे अमेरिकेचे सिरियातील उद्दिष्ट असल्याचे पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी स्पष्ट केले.

काही वर्षांपूर्वी सिरिया-इराकसह जगाला हादरा देणारी आयएस ही दहशतवादी संघटना संपल्याचा दावा करून बायडेन प्रशासनाने इराकमधून पूर्ण सैन्यमाघारीची तयारी केली आहे. पण अमेरिकी संरक्षणदलाच्या गुप्तचर विभागातील अधिकार्‍याने आघाडीच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत, सप्टेंबर महिन्यापासून सिरिया-इराकमधील आयएसचा प्रभाव पुन्हा वाढत चालल्याची चिंता व्यक्त केली. गेल्या महिन्याभरात ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी सिरियातील इंधनासंबंधी पायाभूत सुविधा आणि इंधनवाहतूक करणारी यंत्रणा तसेच इराणसंलग्न गटांवर हल्ले चढविले आहेत. आयएसच्या दहशतवाद्यांनी सध्या सिरियाच्या ईशान्येकडील भागात आपले तळ हलविल्याचा दावा अमेरिकी गुप्तचर अधिकार्‍याने केला. त्याचबरोबर स्थानिकांकडून आयएसच्या विचारधारेला समर्थन मिळत असल्याची चिंता अमेरिकी अधिकार्‍याने व्यक्त केली.

अमेरिकेचे लष्करी मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी देखील आयएसच्या वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त केली. मात्र, आयएसच्या हालचालींवर अमेरिकेची करडी नजर असल्याचे किरबाय म्हणाले. तसेच सिरियातील कुर्द संघटना आयएसच्या दहशतवाद्यांवर करीत असलेल्या कारवाईकडेही अमेरिका बारकाईने पाहत असल्याचे किरबाय यांनी सांगितले.

leave a reply