पाकिस्तानी स्थलांतरितांना युरोपमध्ये अवैधरित्या घुसविण्याचा कट स्पेनने उधळला

पाकिस्तानी स्थलांतरितांना माद्रिद – पाकिस्तानी स्थलांतरितांना युरोपिय देशांमध्ये अवैधरित्या घुसविण्याचा मोठा कट स्पेनच्या सुरक्षा यंत्रणांनी उधळला. याप्रकरणी १५ जणांना ताब्यात घेतले असून स्पेनसह आठ देशांच्या पोलीस यंत्रणांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. शेकडोंच्या संख्येने बेकायदेशीररित्या युरोपिय देशांमध्ये घुसखोरी करणार्‍या या पाकिस्तानी स्थलांतरितांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

युरोपच्या बोस्निया या देशात अवैधरित्या राहणार्‍या पाकिस्तानी स्थलांतरितांना कार, व्हॅन्स किंवा ट्रक्समध्ये कोंबून इटली व स्पेनमध्ये आणले जाते. व्हॅन्स किंवा ट्रक्समधून प्रवास करताना या निर्वासितांना अन्नपाण्याची सोय केली जात नसल्याची माहिती स्पॅनिश पाकिस्तानी स्थलांतरितांनापोलिसांनी दिली. स्पेनसह क्रोएशिया, इटलीच्या पोलीस दलाने ही तस्करी करणार्‍यांवर कारवाई केली होती. अवघ्या आठ चौरसमीटरच्या जागेत ७७ पाकिस्तानी स्थलांतरितांना अक्षरश: कोंबले होते, अशी माहिती समोर येत आहे.

ताब्यात घेतलेल्या स्थलांतरितांमध्ये चार अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. पण काही जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे स्पॅनिश यंत्रणांनी म्हटले आहे. युरोपमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रत्येक स्थलांतरिताकडून पाच ते आठ हजार युरो उकळण्यात आले होते. या स्मगलिंगमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांनी आत्तापर्यंत ४०० हून अधिक स्थलांतरितांना घुसविल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

या स्थलांतरितांना मायदेशी रवाना करण्याबाबत युरोपच्या यंत्रणा गांभीर्याने विचार करीत आहेत. पाकिस्तानवर कोसळलेले भयंकर आर्थिक संकट या स्थलांतरणामागे असल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानात महागाई नवनवे उच्चांक गाठत असून रोजगाराच्या संधी कमी होत चालल्या आहेत. पाकिस्तानातील सधनवर्ग देश सोडून परदेशात स्थायिक होण्याच्या तयारीत असल्याची माहिती देऊन पाकिस्तानी माध्यमे त्यावर गंभीर चिंता व्यक्त करीत आहेत.

leave a reply