फ्रान्सच्या पॅरिसमध्ये चीनविरोधात तीव्र निदर्शने

पॅरिस – ‘फ्री हाँगकाँग’चे फलक घेऊन आणि ‘फ्री तिबेट’च्या संदेशाचे मास्क लावून पॅरिसच्या आयफेल टॉवरजवळ चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात जोरदार निदर्शने झाली. ‘चायनीज नॅशनल डे ‘च्या निमित्ताने ही निदर्शने करण्यात आली आणि चीनकडून सुरु असलेल्या मानवाधिकारच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठविण्यात आला.

निदर्शने

जगभरात चीनच्या आक्रमकता आणि दडपशाहीविरोधात तीव्र निदर्शने होत आहेत. १ ऑक्टोबर रोजी चीनच्या ‘नॅशनल डे ‘च्या निमित्ताने २५ देशातल्या ५० शहरांमध्ये चीनविरोधात निदर्शने झाली. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्येही अशी निदर्शने आयोजित करण्यात आली होती.

पॅरिसच्या आयफेल टॉवरजवळील ‘ट्रोकॅडेरो’ चौकात ‘तिबेटियन असोसिएशन’, ‘उघूर असोसिएशन ऑफ फ्रान्स’, ‘दक्षिण मंगोलियन’ तसेच हाँगकाँग आणि तैवानी गट चीनविरोधात एकत्र आले. आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनविरोधी या लढ्यात आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन या गटांनी केले. ‘फ्री हाँगकाँग’, ‘फ्री तिबेट’ अशा घोषणा देत या निदर्शनकर्त्यांनी आयफेल टॉवरचा परिसर दणाणून सोडला होता.

जवळपास तीन तासांहून अधिक वेळ त्यांची चीनविरोधी निदर्शने सुरुच होती. नुकतीच अशा प्रकारची चीनविरोधी निदर्शने जपानमध्ये देखील झाली होती. तर हाँगकाँगमधल्या निदर्शनादरम्यान एकाने भारताचा राष्ट्रध्वज घेऊन चीनच्या विरोधात लढणाऱ्या आक्रमक भारताला पाठिंबा दिला होता. जगभरात चीनच्या कम्युनिस्ट सरकारविरोधात निदर्शनांची तीव्रता वाढली आहे. यामुळे चीन अधिकच अस्वस्थ झाला आहे. त्यामध्ये आता हे चीनविरोधी गट चीनला धडा शिकविणाऱ्या भारताकडे आशेने पाहत आहेत. यातून भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान मजबूत होत आहे. दोनच दिवसांपूर्वी चीनविरोधात उभ्या राहिलेल्या तैवान, जपानचे भारताने नेतृत्व करावे, असे आवाहन चीनविरोधी लोकशाही समर्थक गटांनी केले होते.

leave a reply